

Harassment and assault in Nashik: नाशिक जिल्ह्यातील भावली धबधबा इथं पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर अत्यंत धक्कादायक प्रसंग ओढवला आहे. काही स्थानिक गुंड आणि सराईत गुन्हेगारांनी या कुटुंबाच्या गाडीवर हल्ला चढवला.
यावेळी या कुटुंबातील महिलेवर काही तरुणांनी अश्लिल कमेंट्स केल्या, त्यांचा पाठलाग केला तसंच त्यांना लोखंडी रॉडनं मारहाणही करण्यात आली, असा थरारक प्रसंग या महिलेनं पत्रकार परिषदेत दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, यावर पोलिसांनीही कारवाई करत ९ जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी नाशिकचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, १२ तारखेला संध्याकाळी ही घटना घडली. महिलेवर हात उचलणे, विनयभंग केल्याचा गुन्हा, त्यांच्यावर हल्ला करणे, गाडी फोडणे या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे आरोपींवर दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी ९ आरोपींना अटक करण्यात आली असून हे सर्व इगतपुरी परिसरातील आहेत. यांपैकी एका आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा इथल्या पर्यटनावर परिणाम होणार नाही, या अनुषंगानं आम्ही कठोर कारवाई करत आहोत.
भावली धबधबा परिसरात पोलीस बंदोबस्त असतो. मात्र, घटना घडली तिथे पोलीस नव्हते. पोलिसांचा बंदोबस्त पर्यटन परिसरात जाणाऱ्या रस्त्यांवर असतो. छेडछाड करण्यावरून ही जीवघेणी घटना घडली. पर्यटन स्थळांवर मद्यपींवर कारवाई करत आहोत, नाकाबंदी देखील असते.
मात्र, आता या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढवत आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून रात्रीतून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. भिवंडी, वाडा परिसरातून लपून बसलेल्या ठिकाणाहून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाण्यातून गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. ९ आरोपी अटकेत असून त्यांना मदत करणाऱ्यावर देखील कारवाई करणार आहोत. पुन्हा असा प्रकार घडणार नाही, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करू, असं आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिलं.
दरम्यान, आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा घटनाक्रम पीडित महिलेनं सांगितला. तिनं म्हटलं की, परवा आम्ही फिरायला गेलो होतो. दुपारी 2 वाजता इच्छित स्थळी पोहोचलो. आमच्या मुलांनी धबधबा एन्जॉय केला. त्यानंतर मी कपडे बदलायला गेले, त्यावेळी माझ्यावर दोन जणांनी कमेंट पास केली. त्यानंतर त्यांनी परत माझ्यावर कमेंट केली.
नेमकं काय झालंय हे पाहायला मग माझे पती आले आणि त्यांनी या गुडांना जाब विचारला. त्यावेळी आमच्यासमोर एका दुकानावर 8 ते 10 जण उभे होते. त्यांनी माझ्या पतीसोबत हातपाई करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे एक बलेनो गाडी आली, त्यातून एकानं हातानं आमच्या गाडीच्या काचा फोडल्या. पुढे गेल्यावर त्यांनी आमचा पाठलाग केला. रॉडनं आमच्या गाडीवर हल्ला केला.
पहिल्यांदा आमच्यावर भावली डॅम इथं या गुडांनी हल्ला केला. नंतर टोल नाक्यावर हल्ला केला, नंतर पुन्हा दगड मारून हल्ला केला. शेवटी आम्ही जीव वाचवण्यासाठी बॅरिकेड्स तोडून तिथून पळालो. नंतरही ते आमच्या पुढे आले.
मग आम्ही मुंबईच्या बाजूला गाडी वळवली आणि पळालो. त्यातील एक जण आमच्या गाडीला लटकला. आम्ही थांबू सुद्धा शकत नव्हतो. मागून बलेनो कार पुन्हा आमचा पाठलाग करत होती. नंतर काही स्थानिक लोक आमच्या रस्त्यात उभे होते, त्यांच्याकडं आम्ही मदत मागितली.
त्यानंतर मागून आलेल्या मुलाने मला धरलं. त्याठिकाणी झटापटीत माझी सोन्याची चैन हरवली. तिथून आम्ही थेट अंबड पोलिस स्टेशन पोहोचलो. या ठिकाणी आल्यानंतर झिरो FIR ने गुन्हा दाखल झाला. काल स्पॉट पंचनामा झाला. पोलिसांनी आम्हाला दोन गाड्यांचं संरक्षण दिलं. या गुंडांना मुली, बायका काहीच दिसत नव्हतं, आम्ही जर तिथं थांबलो असतो तर आमच्या कुटुंबापैकी कोणाचा मृत्यू झाला असता माहीत नाही.
आम्ही 20 ते 30 किलोमीटरपर्यंत मरण बघत आलो. त्यांना खूपच राग होता तर त्यांनी एकदा मारलं असतं. पण 30 किलोमीटर पाठलाग करून त्यांना आमचा मर्डर करायचा होता. आम्ही पोलिसांना फोन केला, मात्र रेंज नव्हती.
केस दाखल करू नका यासाठी एका अज्ञात व्यक्तीनं आम्हाला 10 लाख रुपयांची ऑफरही दिली, अशा प्रकारे या पीडित कुटुंबातील महिलेंन आपल्या कुटुंबावर ओढवलेला भयानक प्रसंग पत्रकार परिषदेत कथन केला. तसंच गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी या पीडित कुटुंबीयांनं पोलिसाकडं केली आहे. तसंच पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावं, असंही या पीडित महिलेनं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.