Parbhani Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आधी शरद पवार नंतर अजित पवार आणि पुन्हा शरद पवारांच्या पक्षात गेलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पुन्हा अजित पवारांकडे परतण्यासाठी वेटिंगवर असलेल्या दुर्राणी यांचे तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म झालेच नाही. अखेर अधिक वाट न पाहता दुर्राणी यांनी आमदार अमित देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबई येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात बाबजानी दुर्राणी (Babajani Durani) आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. आमदार अमित देशमुख यांनी बाबजानी दुर्राणी यांना उद्देशून 'बहुत देर कर दी मेहरबां आते आते', म्हणत चिमटा काढला. पण देर आये दुरूस्त आये, म्हणत बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशामुळे केवळ परभणीच नाही, तर मराठवाड्यात काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
मराठवाड्याच्या मातीतला वाघ आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. बाबाजानी दर्राणी आमदार असताना विधिमंडळाच्या आवारात जेव्हा आमची भेट व्हायची, तेव्हा अनेकदा मी त्यांना म्हणालो,आता काँग्रेसमध्ये यायला हरकत नाही. (Congress) त्यांनी तो निर्णय घेतला, याचे मी स्वागत करतो. आज तो योग आणि वेळ आली. मला आनंद याचा आहे की आपल्या प्रातांध्यक्षांनी जनमताला महत्व दिलं. बाबजानी लोकनेता असं मी म्हणालो तर ते चुकीचे ठरणार नाही, आजचा पक्षप्रवेश दृष्ट लागण्यासारखा असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
तुमच्या आगमनाने मराठवाड्यात काँग्रेस पक्षाचे भविष्य उज्जवल ठरेल. बाबाजीनी यांच्या पक्षप्रवेशाने मराठवाड्यात आपली ताकद वाढणार. त्यांनी परभणीत पक्ष एक नंबरचा करण्याची ग्वाही दिली आहे, पक्ष म्हणून तुम्ही जेव्हा आवाज द्याल, तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे असू, असा विश्वासही अमित देशमुख यांनी यावेळी बाबजानी दुर्राणी आणि त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केलेल्या परभणी, पाथरी मतदारसंघातील शकडो पदाधिकाऱ्यांना दिला.
परभणी काँग्रेस नंबर एकचा पक्ष करणार..
पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी छोटेखानी भाषण केले.मुस्लिम, दलितांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. विलासराव नेहमी म्हणायचे तुम्ही काँग्रेसमध्ये असायला पाहिजे, आज त्यांची आठवण माझ्या मनात आहे. आजचे राजकारण, परिस्थिती वाईट आहे. देशात काँग्रेस आणि भाजप दोनच पक्ष शिल्लक राहतील, असे सांगतानाच भाजपाविरोधात लढा देणार काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे बाबाजानी दुर्राणी म्हणाले.
जाती-धर्माचं राजकारण करून जास्त दिवस सत्ता उपभोगता येणार नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आता परभणीमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष राहील, ही ग्वाही देतो. आधी राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष होता, आता काँग्रेसच.पक्षाला ताकद मिळावी यासाठी केवळ परभणीच नाही तर मराठवाड्यात प्रयत्न करणार. सामाजिक एकोपा जपण्यासाठी काँग्रेस पक्षाचीच कास धरावी लागेल, असे मला वाटत होते.
परभणीची राजकीय जमीन सुपीक आहे. काँग्रेसमध्ये जाण्याचा चांगला निर्णय घेतल्याचे मला कार्यकर्ते आज सांगत आहेत. जालन्यात कोणी गेल्याने काही फरक पडणार नाही, नेते जाऊ द्या, कार्यकर्ते, मतदार जागेवर आहेत. बरे-वाईट दिवस आता निघून जातील. अनेकांना अमिष दाखवून रोखले. पण त्यांच्याकडे आता काही शिल्लक नाही, असा टोलाही बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या भाषणात लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.