छत्रपती संभाजीनगर : राजकारणातील घराणेशाही, त्यावर होणारी टीका हे आता नवे राहिलेले नाही. पण कुठल्याही क्षेत्रात वडीलांना जशी आपल्या मुला-बाळांच्या करिअरची चिंता सतावते तशी राजकारणाती पुढाऱ्यांनाही ती सतावते. इंजिनिअर, डाॅक्टर, आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा जर त्या क्षेत्रात पुढे जात असेल तर त्याचे कौतुक केले जाते. पण राजकारणात याला घराणेशाही म्हटले जाते. पण अशा आरोपांना राजकारण्यांनी कधी फारसे महत्व दिले नाही, की त्यांना वर्षानुवर्षे निवडून देणाऱ्या मतदारांनी.
त्यामुळे राजकारणातील घराणेशाही हा फक्त चर्चेचा विषय ठरला आहे. मराठवाड्यातील सध्या दोन बड्या नेत्यांच्या मुलींच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाची चर्चा होताना दिसते आहे. एक म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार (Ashok Chavan) अशोक चव्हाण, तर दुसरे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची. या दोन्ही नेत्यांनी आपल्या लेकींना निवडून आणण्यासाठी सगळी ताकद पणाला लावली होती. विधानसभेच्या कन्नड मतदारसंघातून दानवे यांच्या कन्या संजना जाधव तर भोकर मधून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या विजयी झाल्या आहेत.
भोकर विधानसभा मतदारसंघ हा दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यापासून या कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आजोबा, वडील, आई आणि आता मुलगी अशी चव्हाण कुटुंबातील चौथी पिढी भोकर मतदरासंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अशोक चव्हाण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी घेतलेल्या मोठ्या राजकीय निर्णयानंतरची ही पहिलच विधानसभा निवडणूक होती. (Raosaheb Danve) राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महायुती सरकारविरोधात रोष होता.
नेते, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना गावबंदी होती. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना या गावबंदी आणि मराठा आंदोलकांच्या रोषाला समोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांनाही काही भागात विरोधाला तोंड द्यावे लागले. पक्ष सोडून गेल्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस मधील त्यांच्या समर्थकांनी भोकर मतदारसंघातील प्रचारातून अंग काढून घेतले.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दारुण पराभवाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याच्या आरोपाचा शिक्का त्यांच्या कपाळी तसाच होता. अशावेळी भोकरची जागा राखून मुलीला आमदार करण्यासाठी अशोक चव्हाण यांना चांगलेच झगडावे लागले. मी संपलो तर, तुम्ही संपाल. मला संपवू नका, मी तुमचे असे काय नुकसान केले आहे? असे आवाहन अशोक चव्हाण यांनी जाहीर सभांमधून केल्याचे बोलले जाते.
श्रीजया चव्हाण यांना निवडून आणत भोकर मतदारसंघावर असलेले वर्चस्व कायम राखण्यासाठी अशोक चव्हाण यांनी प्रचंड मेहनत घेतली. भोकरच्या जय-पराजयाचे चांगेल वाईट परिणाम अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीवर होणार होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या लेकीच्या पाठीशी अशोक चव्हाण हे भक्कपणे उभे राहिले. लेकीला आमदार करूनच अशोक चव्हाण थांबले. लेकीसाठी लढलेला हा 'बाप माणूस' महाराष्ट्राने पाहिला.
दानवेंनी मोहिम फत्ते केली..
भोकरमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली, तशी इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघात रावसाहेब दानवे यांची लागली होती. संजना जाधव यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी 'बाप' म्हणून जे करता येईल ते रावसाहेब दानवे यांनी केले. कन्नड विधानसभा मतदारसंघातूनच लेकीला आमदार करण्याचा दानवे यांनी केलेला निर्धार त्यांनी खरा करून दाखवला. राज्यात महायुती असल्याने तीनही पक्षाच्या ताकदीवर कन्नडची जागा जिंकणे अवघड नाही हे राजकारणात `दादा` असलेल्या रावसाहेब दानवे यांनी हेरले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजना जाधव यांना उमेदवारी मिळवून दिली. निवडणूक जिंकण्यासाठी टाकावे लागणारे डावपेच, खेळाव्या लागणाऱ्या खेळी, मतदारांना करावे लागणारे आवाहन अशा सगळ्या गोष्टींच्या चाळीस वर्षातील अनुभवाची शिदोरी दानवे यांनी आपल्या लेकीसाठी खुली केली. संजना जाधव यांचा कन्नडमधील विजय एका `बाप माणसा`ने आपल्या लेकीसाठी केलेल्या संघर्षातून साकारला गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बॅकफुटवर गेलेले रावसाहेब दानवे विधानसभा निवडणुकीत मुलगा आणि मुलीच्या विजयासाठी मैदानात उतरले. प्रत्यक्ष रणांगणात उतरलेल्या संतोष आणि संजना जाधव या बहीण भावाच्या पाठीशी दानवे खंबीरपणे उभे राहिले. दानवे यांच्याकडे दहा वर्षात केलेल्या विकास कामांची यादी होती, कन्नडमध्ये मात्र संजना जाधव यांची पाटी कोरी होती. अशावेळी पहिल्याच प्रयत्नात त्यांना मिळालेला विजय निश्चितच मोठा आणि महत्वाचा ठरतो. अर्थात याचे श्रेय रावसाहेब दानवे यांना द्यावेच लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.