
सिल्लोड : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव मतदार संघातून शिवसेना महायुतीचे अब्दुल सत्तार 2420 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल अजूनही मतदारसंघात शंका उपस्थित केल्या जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर यांनी आपल्या निसटत्या पराभवावर अद्याप भाष्य केले नव्हते.मात्र मतदारसंघात आभार दौरा काढल्यानंतर बनकर यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले.
सत्तार यांनी आपल्या संस्थेतील शाळेच्या तब्बल 5000 अल्पवयीन मुलांची बोगस जन्मतारखेचे दाखले आणि त्या आधारे आधार कार्ड तयार करून मतदार यादीत नावे घुसवल्याचा दावा करत सुरेश बनकर यांनी खळबळ उडवून दिली. या बोगस मतांच्या आधारेच (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी हा विजय मिळवला. मतदारांनी आपल्यालाच कौल दिला होता मात्र बोगस मतदानामुळे लोकशाहीचा गळा घोटला गेला.
धनशक्ती विरोधात झालेल्या लढतीत जनशक्तीचा पराभव झाला, असे म्हणत सुरेश बनकर यांनी सत्तार यांच्या विजयावर आक्षेप घेतला. (Shivsena) मतदारसंघांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रचंड रोष होता. प्रचार सभा,पदयात्रा आणि बैठकांमधून तो स्पष्टपणे दिसत होता. मात्र नेहमीप्रमाणे बोगस मतदारांची नोंदणी आणि दुबार मतदार नावांवर आम्ही घेतलेल्या तक्रारीची कुठलीच दखल प्रशासनाने घेतली नाही.याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला.
मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत भरभरून मतदान केले म्हणूनच मी एक लाख पस्तीस हजार मतांची मजल गाठू शकलो. मात्र जाती धर्मात तेढ निर्माण करून वातावरण बिघडवण्याचे काम आणि बोगस मतदारांच्या जीवावर मिळवलेला सत्तार यांचा हा विजय आहे, असा आरोपही बनकर यांनी केला.
पराभवानंतर मतदार संघात काढलेल्या आभार दौऱ्यात मला लोकांची प्रचंड सहानुभूती मिळत आहे. लोक गळ्यात पडून रडत आहेत, हे प्रेम जनतेने मला दिले आहे. यावरून विजय नक्की कोणाचा झाला? हे स्पष्ट होते. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव हा माझा नसून जनशक्ती आणि लोकशाहीचा आहे.
सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दबाव आणून दुबार नावे, बोगस नावे, शहरातील मतदारांची नावे तर काही ठिकाणी चक्क मृत झालेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत दिसली. या विरोधात आम्ही निवडणुकीआधीच आवाज उठवला होता मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.प्रशासनावर दबाव टाकून मिळवलेला सत्तार यांचा हा विजय असल्याचेही बनकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.