
Parbhani News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता सेलू येथील राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सत्कार समारंभावेळी परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांचा चांगलाच समाचार घेतला.
या सत्कार समारंभाच्या दोन दिवसांपूर्वी खासदार संजय जाधव (Sanjay Jadahav) यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात मेघना बोर्डीकर या तीन नंबरवर होत्या, पण त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात मतदारांना पैशाचे आमिष दाखवले. त्यामुळे त्या निवडणुकीत विजयी झाल्या, असा आरोप केला होता. खासदार जाधव यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी घेतला.
खासदार जाधव हे वारकरी संप्रदायाचे ढोंग करत असतात. त्यांनी मी कशी निवडून आले यावर बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही दोनवेळा कोणामुळे खासदार झालात, हे विसरलात का? आपण दहा वर्षे खासदार राहिलात, या दहा वर्षात जिल्ह्यासाठी एक तरी चांगले काम केले का ते दाखवा? तरच दुसऱ्यांना नावे ठेवा. केवळ या निवडणुकीत संविधान बदलणार अशा खोट्या अफवा पसरवून जिंकून आला आहात, अशी टीका राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली.
या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. मी महिला आहे, माझ्या बाबांचे वय झाले आहे, असा प्रचार करण्यात आला. पण मी पण बोर्डीकरांची लेक आहे. मी महिला असले तरी वेळप्रसंगी दुर्गेचे रूप देखील धारण करू शकते आणि त्यामुळेच मी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघाची वेगळी ओळख आहे. या ठिकाणी एकदा निवडून आलेला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येत नाही. पण माझे बाबा रामप्रसाद बोर्डीकर या मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आणि आता मी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. या मतदारसंघात माझ्या वडिलांनी गेल्या पन्नास वर्षापासून मेहनत घेतली आहे. त्याचा मला या निवडणुकीत मोठा फायदा झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्री पदाचा मी पदभार स्वीकारला आहे. माझ्याकडे मंत्रिमंडळातील चांगली खाती आहेत. सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा आणि महिला व बाल विकास अशी सक्षम खाती आहेत. या खात्याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ताकदीने कामाला लागणार आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे आणि महिला व बालकांच्या सर्व योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.