
Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात दारुण झालेला पराभव आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतही विजयाची फारशी आशा नसल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. निष्ठावंतांच्या मेळाव्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घातलेले लोटांगण, अंबादास दानवे यांनी घरोघरी जाऊन घेतलेली थेट भेट हे सगळं वाया जाणार, असेच दिसते.
गेल्या महिनाभरापासून ज्या दहा ते बारा माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्याचा मुहूर्त अखेर ठरला असून (Chandrakant Khaire) खैरे-दानवे यांनी केलेली मनधरणी झुगारून भविष्यात आपली घडी बसावी या उद्देशाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 25 तारखेला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे जालना येथे आभार मेळाव्यासाठी येणार आहेत.
याच मेळाव्यात (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याला दुजोरा दिला असून कालच उद्धवसेनेच्या शहरातील पूर्व मतदारसंघातील 35 पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत भाजपामध्ये प्रवेश केला. या धक्क्यातून सावरत नाही तोच शिवसेना शिंदे गटाकडून आणखी एक झटका उद्धव ठाकरेंना दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यात निवडून आला नाही. सलग दोन लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. या सगळ्या घडामोडी पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक अस्वस्थ आहेत. पाच वर्ष विरोधी पक्षात थांबण्याची आता कोणाचीही तयारी नाही.चंद्रकांत खैरे- अंबादास दानवे यांनी जाणाऱ्यांना रोखण्यासाठी केलेले प्रयत्नही अयशस्वी ठरत आहेत.
माजी महापौर नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत खैरे-दानवे यांना पक्षाला लागलेली गळती रोखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खैरे-दानवे यांनी एकत्रित येत पक्षाचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यात दोघांनी केलेल्या भाषणातून शिवसैनिकांना खचून न जाण्याचे आणि कुठेही न जाण्याचे आवाहन केले होते.
खैरेंनी तर हात जोडले, साष्टांग दंडवत घातले. अंबादास दानवे यांनी देखील माजी नगरसेवकांच्या बैठका घेतल्या, त्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही असे दिसते. त्यामुळेच अंबादास दानवे यांनी 'ज्याला जायचे त्यांनी खुशाल जा', असे उद्विग्न होत म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.