
Latur Congress News : लोकसभेच्या लातूर मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपाचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी थेट महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावर प्रगट होत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले होते. या प्रवेशावेळी त्यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर तोफ डागली होती. अनेकांनी निवडणुकीत आपला प्रचारच केला नाही, असा आरोप करत लातूरमध्ये आता भाजपचा पूर्णपणे सफाया करायचा, असे भीमादेवी थाटात सांगत त्यांनी तेव्हा टाळ्या मिळवल्या होत्या.
लातूर (Latur) शहर आणि लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार अमित आणि धीरज देशमुख तसेच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासमोर जोरदार भाषण करत सुधाकर शृंगारे यांनी वाह वाह मिळवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कमबॅक करत 232 जागा पटकावल्या. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने काँग्रेस पक्षात गेलेल्या सुधाकर शृंगारे यांच्या भ्रमाचा भोपळा अवघ्या पाच महिन्यात फुटला. आता आपण काँग्रेस पक्षात नाही, असे जाहीर करत त्यांनी भाजपामध्ये घरवापसीची तयारी सुरू केल्याची चर्चा लातूर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
2019 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुधाकर शृंगारे यांनी केले. 2024 मध्ये पक्षाने दुसऱ्यांदा त्यांना संधी दिली, पण महाविकास आघाडीच्या झंझावातात सुधाकर शृंगारे पराभूत झाले. मात्र या पराभवाचे खापर शृंगारे (Congress) यांनी पक्षातील नेत्यांवर फोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. अमित देशमुख, धीरज देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या सभेत थेट शृंगारे प्रकटले.
आजपासून आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची जाहीर करत त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या सभेत त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा तेव्हा बरीच रंगली होती. लोकसभेला मला पराभूत करून काँग्रेसमध्ये येण्याची संधी दिल्याबद्दल तुमचेही आभार, असे म्हणत शृंगारे यांनी जोरदार फटकेबाजी केली. शृंगारे यांच्या भाषणाने महाविकास आघाडीच्या नेते आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे चांगलेच मनोरंजन झाले होते.
लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी मला प्रचार करू दिला नाही आणि स्वतः आजारपण, बैठकांची कारण देत घरात बसून राहिले. एक आमदार तर मी माझ्या मतदारसंघातून मायनस आहे असे सांगून प्रचाराला फिरकलाच नाही, असा टोला शृंगारे यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना तेव्हा लगावला होता. याशिवाय संभाजी पाटील निलंगेकर, रमेशआप्पा कराड यांच्यावरही शृंगारे चांगलेच बरसले होते. आता या जिल्ह्यात भाजपच्या सगळ्या आमदारांना पाडायचं आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सहा आमदार निवडून आणायचे, असे आवाहन शृंगारे यांनी केले होते.
प्रत्यक्षात मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित देशमुख यांची लातूर शहरची जागा सोडता संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचे आमदार निवडून आले. आपला राजकीय अंदाज चुकला हे लक्षात आल्यानंतर सुधाकर शृंगारे यांनी आता काँग्रेसलाही 'हात' दिला आहे. आपण काँग्रेस पक्षात नाही असे, शृंगारे सांगू लागले आहेत. भविष्यात काय? यावर लवकरच तुम्हाला कळेल, असा सूचक इशाराही ते देताना दिसत आहेत. एकूणच सुधाकर शृंगारे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करतात का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.