
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई चलो आंदोलन छेडले.
उपोषण पाच दिवस चालल्याने सरकारवर दबाव वाढला.
महायुती सरकारने मराठ्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर बंजारा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
बंजारा समाजाने तातडीने एसटी प्रवर्गात समावेश न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
Hingoli News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देत मुंबई चलोचा नारा दिला होता. मुंबई त्यांना एका दिवसाची परवानगी असताना तब्बल पाच दिवस उपोषण चालले. या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने हालचाली तीव्र केल्या आणि मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला. पण आता हाच निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसीसह बंजारा समाजही आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. बंजारा समाजाने तर हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात तातडीने समावेश करा, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू, असा इशाराच सरकारला दिला आहे.
राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच सोडवला आताही सोडवू पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता अशी भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. समाजातील प्रमुख नेत्यांनी आता दुहेरी लढा देण्याची घोषणा केली. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी बहिष्काराची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने ओबीसीसाठी उपसमितीची घोषणा केली.
यानंतर आता मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ दिला जाईल, अशी स्पष्ट कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच त्यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून त्यांनी मागत राहावं, आम्ही शक्य तेवढं देत राहू असे आश्वासनही पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे दिलं आहे. यामुळे ओबीसी समाजाची नाराजी काहीसी कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील बंजारा समाजही आता आरक्षणाची मागणी करत असून थेट सरकारला इशाराच दिला आहे. हिंगोलीत बंजारा व शिख बांधवांची एकत्रित बैठक झाली या बैठकीनंतर जितेंद्र महाराज यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी जितेंद्र महाराज म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटरी लागू केले. याबाबत ताबडतोड शासन निर्णयही काढला. मात्र आता याच शासनाने महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठीही हैदराबाद गॅजेट लागू करावे.
हैदराबाद गॅजेटनुसार आमचा एसटीमध्ये प्रवेश होवू शकतो. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोलीत केली आहे. तसेच सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढतील, असाही इशारा यावेळी बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी दिला आहे.
तसेच धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी एसटी समाजामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे मराठा समाजाला खूश करण्यासाठी महायुती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला. आता तोच निर्णय सरकारच्याच अंगलट आल्याचं बोललं जात आहे.
प्र.१: मनोज जरांगे पाटील यांनी कोणते आंदोलन पुकारले?
उ. त्यांनी मराठा आरक्षणासाठी "मुंबई चलो" आंदोलन पुकारले.
प्र.२: हैदराबाद गॅझेटचा निर्णय काय आहे?
उ. राज्य सरकारने मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला.
प्र.३: बंजारा समाजाची मागणी काय आहे?
उ. बंजारा समाजाचा तातडीने एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
प्र.४: ओबीसी समाज का आक्रमक आहे?
उ. आरक्षणात मराठ्यांना प्राधान्य दिल्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे.
प्र.५: या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
उ. महाराष्ट्रात मोठं आंदोलन उसळण्याची आणि राजकीय संकट वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.