

नवनाथ इधाटे
BJP news : भाजपाकडे असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने मोठ्या राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार फुलंब्रीमध्ये अचानक सक्रिय होणे, फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्यासह 13 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश या घडामोडी भाजपासाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहेत.
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि आता नगरपंचायतीच्या सत्तेच्या माध्यमातून नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे आणि त्यांच्या नगरसेवकांचे मिळालेले बळ या जोरावर भाजपा आमदार असलेल्या या मतदारसंघात शिवसेना उचल खाऊ पाहत आहे. शिवसेनेच्या वर्चस्वाचा हा वाढता धोका लक्षात घेता भाजपाने तातडीने सावध पावले उचलत हालचाली सुरू केल्या.
आमदार अब्दुल सत्तार नवा डाव टाकण्याआधीच भाजपने त्यांचे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सत्तारांच्या तोंडचे पाणी पळवणारे सुरेश बनकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. संभाजीनगर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीनगर पूर्वचाच भाग असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांचा वावर वाढताच भाजपने त्यावर सुरेश बनकर यांच्या माध्यमातून जालीम उपाय शोधण्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपच्या ताब्यात असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील वडोद बाजार येथे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीविष्णू मंदिराच्या बांधकामासाठी पाच लाख रुपयांची देणगी देत फुलंब्रीत सक्रियता दाखविल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. या चर्चेला दुसऱ्याच दिवशी भाजपने सिल्लोडच्या राजकारणातील सत्तार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेल्या सुरेश बनकर यांची छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करून राजकीय रंग दिला आहे.
बनकरांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देत भाजपने सिल्लोडमध्ये त्यांना मोठे संघटनात्मक बळ दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. फुलंब्रीतील वडोद बाजार येथील श्रीविष्णू मंदिराच्या बांधकामासाठी सत्तार यांच्या वतीने दोन लाख रुपये, जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल बोरसे यांनी प्रत्येकी दीड लाख रुपये, अशी एकूण पाच लाखांची मदत दिली.
फुलंब्री हा भाजपच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघ असून अनुराधा चव्हाण या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात येऊन सिल्लोडच्या शिवसेनेच्या आमदारांनी मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केल्याने त्यांच्या या सक्रियतेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले गेले. फुलंब्रीत सत्तारांचा वाढता संपर्क ही स्थानिक राजकारणातील चर्चेची बाब ठरत असतानाच भाजपने सिल्लोडमध्ये महत्त्वाची संघटनात्मक चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
सत्तारांविरोधात बनकरांना भाजपचे बळ
सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष सिल्लोडच्या राजकारणात जुना आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये थेट लढत झाली होती. या निवडणुकीत सत्तार यांचा विजय अवघ्या २ हजार ४२० मतांनी झाला. सत्तारांना १ लाख ३७ हजार ९६०, तर बनकरांना १ लाख ३५ हजार ५४० मते मिळाली. अल्प मताधिक्याने झालेला हा विजय आणि बनकरांना मिळालेली मोठी मतसंख्या पाहता सिल्लोडमध्ये त्यांचे राजकीय वजन कायम असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. आता भाजपने त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर पूर्व जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी सोपविल्याने सिल्लोडच्या राजकारणात बनकरांना पुन्हा मोठे व्यासपीठ मिळाले आहे.
सिल्लोडमध्ये वेगळे राजकीय गणित
राज्यात शिवसेना आणि भाजप महायुतीत एकत्र आहेत. मात्र सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि सत्तार यांच्यातील राजकीय स्पर्धेला वेगळी पार्श्वभूमी आहे. २०२४ मध्ये बनकरांनी सत्तारांविरोधात निवडणूक लढविल्याने दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिक स्पष्ट झाला होता. त्यामुळे भाजपने सत्तारांचे राजकीय विरोधक असलेल्या बनकरांना जिल्हाध्यक्षपद देणे ही केवळ संघटनात्मक नियुक्ती नसून सिल्लोडमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
फुलंब्रीत सत्तारांचा वाढता संपर्क आणि सिल्लोडमध्ये बनकरांना मिळालेले संघटनात्मक बळ यांची सांगड घालत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. फुलंब्रीत भाजपचे आमदार कायम असताना सत्तारांचा या मतदारसंघातील वाढता सामाजिक-सार्वजनिक संपर्क आणि त्याचवेळी सिल्लोडमध्ये बनकरांच्या माध्यमातून भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्णय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्तार फुलंब्रीत सक्रिय होत असताना भाजपने सिल्लोडमध्ये बनकरांना पुढे करून राजकीय संदेश दिला का? याची चर्चा आता स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.