Nanded News : शिवसेना पक्ष व चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल प्रभावीपणे युक्तिवाद करीत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून शिवसेनेतील केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत, असा दावा केला जात आहे. त्यातच आता राज्यातील कोट्यवधी भगिनींना वाटते की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे मोठे विधान शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर महायुतीत चर्चांना उधाण आले आहे.
खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. येथील शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्याअंतर्गत त्या महिलांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. महाराष्ट्रातील कोट्यवधी भगिनींना वाटते की एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सर्वात अॅक्सेसिबल उपमुख्यमंत्री असून, त्यांनी कॉमन मॅन कसा मुख्यमंत्री असतो हे दाखवून दिले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही विश्वास व्यक्त केला. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटालाच खरी शिवसेना मानले आहे. जनतेच्या न्यायालयानेही हेच सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष व चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जण मीडियासमोर बोलताना मीच वकील, मीच जज अशा पद्धतीने बोलत आहेत व वागत आहेत. मात्र, कोर्टात आमचे वकील ज्यावेळी बाजू मांडतील, त्यावेळी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर चोखपणे मिळेल, असेही यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले. राऊत यांनी आधी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. महिलांवरील टिप्पणीबद्दल सुषमा अंधारे यांच्यावरही त्यांनी टीका केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, वंचित घटकांना न्याय मिळायला हवे, तर पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.