Jalna Political News : भाजपामध्ये प्रवेश करताच आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढा, महापौर करतो, असा दावा करणारे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. या वाढलेल्या आत्मविश्वासातूनच त्यांनी तिरंगा यात्रेच्या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना भाजपात येण्याची ऑफर देऊन टाकली. 'बस झाले, आता तिकडे थांबू नका, आमच्याकडे या' अशी जाहीर साद घातल्याने आंबेकरही चकित झाले.
काँग्रेसकडून तीनवेळा जालन्याचे आमदार झालेले कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, अतुल सावे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्तीप्रदर्शनाने गोरंट्याल यांची पक्षात एन्ट्री झाली. शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांना शह देण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी कैलास गोरंट्याल यांचे अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात झाली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार असे जरी राज्यातील नेते सांगत असले, तरी स्थानिक पातळीवर वेगळेच खेळ खेळले जात आहेत. कैलास गोरंट्याल यांचा भाजपामधील (BJP) प्रवेश हा त्याच खेळाचा भाग समजला जात आहे. कैलास गोरंट्याल यांनी भाजपाने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, महापौर करून दाखवतो, असा शब्द वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. त्या दृष्टीने इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना गळ घालण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
खासदार काळे, खोतकरांनी घेतली होती आंबेकराची भेट..
काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे खासदार डाॅ.कल्याण काळे, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. तसेच त्यांच्या मातोश्रींच्या प्रकृतीचीही चौकशी केली होती. या भेटीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कैलास गोरंट्याल यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस त्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांशी काळे यांनी भेटीगाठी वाढवल्या आहेत.
दुसरीकडे अर्जुन खोतकर यांना कैलास गोरंट्याल यांना रोखण्यासाठीही आपल्या जुन्या मित्रांची गरज भासू लागली आहे. भास्कर आंबेकर, खोतकर हे गेली वीस पंचवीस वर्ष एकाच पक्षात सोबत होते. त्यामुळे आज ते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. याच संबंधातून खोतकर यांनीही आंबेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर कैलास गोरंट्याल यांनी भास्कर आंबेकर यांना थेट भाजपात प्रवेश करा, आता तिकडे थांबू नका, असे म्हणत थेट ऑफरच दिली. आंबेकर यांनी यावर अद्याप कुठलेच भाष्य केलेले नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर अर्जुन खोतकर एकनाथ शिंदेंसोबत गेले. जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण भास्कर आंबेकर हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निष्ठेचे कौतुक आणि चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे. त्यामुळे आंबेकर भाजपात जाण्याचा विचार करतील, अशी शक्यता कमी वाटते. परंतु राजकारणात सध्या काहीच अशक्य नसल्यामुळे स्थानिक राजकारण पाहता येत्या काळात काही धक्कादायक निर्णय घेतले जाऊ शकतात. आता गोरंट्याल यांच्या ऑफरला आंबेकर कसा प्रतिसाद देतात? हे लवकरच कळेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.