Jalna News, 16 Dec : जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत झालेल्या पहिल्या जालना महापालिका निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या अर्जुन खोतकर यांना मत देण्यासाठी गोरंट्याल यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवेंच्या माध्यमातून भाजपचे कमळ हाती घेतले.
या प्रवेश सोहळ्यातच भाजपच्या मुंबईतील नेत्यांना जालना महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवा, मी भाजपचा महापौर करून दाखवतो, असा दावा गोरंट्याल यांनी केला होता. गेल्या महिन्याभरापासून महापालिका निवडणुकीत युती करा, असा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार तथा जालन्यातील नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपचे महानगर प्रमुख भास्कर दानवे यांच्याकडे दिला आहे.
मात्र राज्यातील राजकीय घडामोडी, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालेली फोडाफोडी आणि पळवापळवी पाहता महापालिका निवडणुकीत युती होणार नाही असे बोलले जात होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारी आणि अमित शहांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा बदलले असून महापालिका निवडणुका युती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.
त्यामुळे जालना महापालिकेत भाजपचा महापौर करत नगर परिषदेप्रमाणेच सत्तेची सूत्र आपल्या हाती ठेवण्याचा कैलास गोरंट्याल यांचा डाव फसण्याची शक्यता आहे. काल महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर युती संदर्भात कैलास गोरंट्याल यांनी मोठे भाष्य केले. भाजपने जालना महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याचा दावा करतानाच युतीचा प्रस्ताव घेऊन कोणी जर आपल्याकडे आले तर त्यावर विचार करू, असे म्हणत गोरंट्याल यांनी आता स्वबळाची भाषा सोडून युतीची भाषा सुरू केली आहे.
आपल्याशी चर्चा न करता जर कोणी युती किंवा स्वबळावर लढणार, असे सांगत असेल तर त्यात काहीही अर्थ नाही. वरिष्ठ पातळीवर महापालिका निवडणुकीत युती करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्यामुळे जागा वाटपाची चर्चा नेमकी कशी होते? हे एकत्र बसल्यानंतर ठरेल. तूर्तास ब्रह्मानंद चव्हाण हे मला भेटून गेले आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त युती संदर्भात कुठलाही प्रस्ताव अद्याप आलेला नाही.
तो आल्यावर एकत्र बसून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. एकूणच स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात स्वबळावर लढण्याची इच्छा असलेल्या अनेक नेत्यांची आता गोची होताना दिसत आहे. जालना महापालिकेत अर्जुन खोतकर यांनी अडीच अडीच वर्ष महापौर पदाचा फॉर्मुला आणि युतीचा प्रस्ताव भाजपकडे दिला होता.
त्यात पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा महापौर ही प्रमुख अट त्यांनी घातली होती. मात्र त्यावर भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु आता राज्य पातळीवरच युतीत लढण्याचा निर्णय झाल्यामुळे स्थानिक नेत्यांना तडजोड स्वीकारावी लागणार आहे. कैलास गोरंट्याल यांनी त्या दृष्टीने मानसिकता केल्याचे त्यांच्या भूमिकेवरून दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.