
Shivsena UBT : छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याची मदार असलेल्या शिवसेनेतील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. या दोघांमधील वाद गेल्या दहा वर्षापासूनचा आहे, मात्र तो इतका विकोपाला कधी गेला नव्हता. खैरेंच्या निष्ठेचा मान राखत पक्षाने त्यांना लोकसभेची सहावेळा उमेदवारी दिली. चारवेळा ते निवडून आले, तर दोनदा त्यांचा पराभव झाला.
जिल्हाप्रमुख म्हणून काम करणाऱ्या अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपले संघटन कौशल्य दाखवून पक्षाची ध्येय धोरणं आणि मातोश्रीवरून आलेल्या प्रत्येक आदेशाचे पालन करत जिल्ह्यात शिवसेना जिवंत असल्याचे प्रभावी आंदोलनातून दाखवून दिले. खैरे चाळीस वर्षाहून अधिक काळ पक्षात आहेत, तर अंबादास दानवे हे देखील पंचवीस वर्षापासून जिल्ह्यात जिल्हाप्रमुख, राज्य प्रवक्ते, विधान परिषदेचे आमदार, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत.
तसं पाहिलं तर दोघांनाही पक्षाने भरभरून दिले आहे, असे असताना पक्ष संकटात असताना या दोन नेत्यांच्या महत्वाकांक्षा वारंवार का उफाळून येतात? हा खरा प्रश्न आहे. (Chandrakant Khaire) खैरे यांनी वाढत्या वयाचा विचार करता सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. तर अंबादास दानवे यांनीही पक्षवाढीसाठी खैरेंचे योगदान लक्षात घेता त्यांच्या सन्मान राखला पाहिजे. पण दोघांकडून एकमेकांवर कुरघोडीचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पक्ष एकसंघ होता तेव्हा या कुरबुरींचा फारसा परिणाम कधी जाणवला नाही.
परंतु पक्ष फुटीनंतर खैरे-दानवे यांच्या वादाचे चटके आता बसू लागले आहेत. यावर नेहमीप्रमाणे दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलावून घेत सगळे वाद मिटले, बाहेर माध्यमांसमोर गळ्यात गळे घालून जा आणि पक्षप्रमुखांच्या आदेशाने आम्ही काम करणार असे जाहीर करा, हेच पुन्हा होणार? की मग उद्धव ठाकरे या दोन नेत्यांच्या वादावर कायमस्वरुपी तोडगा काढतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत खैरे यांची निष्ठा आणि अंबादास दानवे यांचे संघटन कौशल्य या दोघांचीही आज गरज आहे. निम्म्याहून अधिक पक्ष रिकामा झाला तरी विरोधकांची भूक थांबलेली नाही. दररोज कुठे ना कुठे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरूच आहे.
मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरेंनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना खैरे-दानवेंच्या वादाला ते किती महत्व देतात हे पहावे लागेल. विरुद्ध दिशेला तोंड असणाऱ्या या दोन नेत्यांना केवळ एकत्र आणायचे नाही, तर त्यांच्यातील कटूता कायमची संपवून दोघांना पक्ष, संघटनेच्या वाढीसाठी हातात हात घालून कामाला लावायचे आहे. ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, ही कठोर भूमिका पक्षाला भगदाड पडलेले असतांना घेऊन चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत आमदारांची संख्या वीसवर आल्याने विरोधी पक्षनेते पदही मिळू शकलेले नाही.
अशावेळी किमान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चमकदार कामगिरी करून मशाल अजूनही धगधगत आहे, हे दाखवण्याची संधी आहे. या संधीची माती पक्षातील अंतर्गत गटबाजीने होऊ नये, यासाठी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. अंबादास दानवे-चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते मातोश्रीवर पोहचले आहेत. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारीसाठीचा मोठा दारुगोळा सोबत नेला आहे. उद्धव ठाकरे हा दारुगोळा कसा नष्ट करतात? आणि काय मार्ग काढतात? यावर छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील पक्षाचे अस्तित्व अवलंबून असणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.