Latur DCC Bank : लातूर बँक चांगली चालवली म्हणतात, पण आमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत : अरविंद पाटील निलंगेकरांनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले!

Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँक निवडणुकीत विरोधी पॅनलच्या चार उमेदवारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यानंतर भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसच्या बँक कारभारावर टीका केली.
BJP leader Arvind Patil Nilangekar criticises Congress over Latur District Central Cooperative Bank management
BJP leader Arvind Patil Nilangekar criticises Congress over Latur District Central Cooperative Bank managementSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP-Congress Politics : लातूर जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत आता रंगत आली आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पॅनलमधील चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते. परंतु या चारही उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाच्या निर्णयाने या चारही उमेदवारांच्या निवडणुकीत कायम राहण्याचा मार्ग आक्षेप फेटाळल्याने मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते व संचालक पदासाठीचे उमेदवार अरविंद पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

अरविंद पाटील निलंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत बँकेच्या कारभारावर टीका केली. लातूर बँक चांगली चालवल्याचा दावा करणारी काँग्रेस व बँकेतील सत्ताधारी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आम्ही उतरलो आहोत. व्यापाऱ्यांच्या हातातून आम्हाला शेतकऱ्यांच्या हातात बँक द्यायची आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला बँकेत परिवर्तन घडवून आणायचे आहे, असा दावा निलंगेकर यांनी केला.

जिल्हा बँक आम्ही चांगली चालवली असे सत्ताधारी सांगत आहेत. पण आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र ते देत नाहीत. जर बँक खरोखरच चांगली चालवली असेल तर त्यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यांनी जर आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली तर उमेदवारी माघे घेवू, असे आव्हान निलंगेकर यांनी काँग्रेसला दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच आम्ही निवडणूक लढत आहोत, असेही निलंगेकर यांनी सांगितले.

जिल्हा बँकेकडून पीक कर्ज वाटप केले जात नाही.कुटुंबातील सदस्य असलेल्या कारखाने, संस्थांनाच यांनी कर्ज वाटप केले आहे. बँकेत दिव्याखाली अंधार आहे, हे आता आम्ही मतदारापर्यंत जाऊन सांगणार आहोत. बँकेतील अधिकारी हे घरगडी असल्यातच जमा आहेत. निवृत्तीनंतरही त्यांना महत्वाच्या पदावर ठेवण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनीच कोण मतदार असावे, कोणत्या संस्था मतदार असाव्यात हे ठरवले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

त्यांना निवडणुकीची भीती वाटत आहे. प्रक्रिया मतदारसंघात तर १७ मतदार आहेत. ते देखील त्यांच्याच कुटुंबातील आहेत, असे असताना देखील विरोधकांचा अर्ज कसा टिकणार नाही याचा प्रयत्न करण्यात आला. पण न्यायालयात न्याय मिळाला असे निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी बाबु खंदाडे, गिरीश पाटील, दगडू साळुंके, कपिल माकणे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.