सुधाकर दहिफळे
Latur News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी जागावाटप करण्यात येत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच आता लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार रमेश कराड यांनी रणशिंग फुंकले असून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.
आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांच्या संवाद यात्रेमुळे लातूर ग्रामीण मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या जनसंवाद अभियानांतर्गत रेणापूर तालुक्यातील सांगवी, सिंधगाव या गावांना आमदार कराड भेटी दिल्या. आमदार कराड हे विधानपरिषदेवर असूनही विधानसभेत जाण्यास उत्सुक दिसत आहेत. यामुळे भाजप (BJP) आमदार कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ज्यांना तुम्ही आमदार केले वैभव मिळवून दिले, त्यांनी तुम्हाला काय दिले ? असा प्रश्न उपस्थित करून विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांनी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्यावर टिका केली. विधान परिषदेचा आमदार असूनही मतदारसंघातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी दिला. मला एकदा लातूर ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेत पाठवा. मतदारसंघातील सर्व गावांतील एकही विकासाचे काम शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे आमदार कराड यांच्या या विधानामुळे ते लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जनसंवाद अभियानांतर्गत रेणापूर तालुक्यातील सांगवी, सिंधगाव येथील संवाद कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार कराड बोलत होते. आमदार कराड म्हणाले, 'मांजरा परिवारातील साखर कारखाने ही देशमुखांची जहागिरी नसून शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक आणि पिळवणूक करणे हेच काँग्रेसच्या नेत्यांचे धोरण आहे.
मांजरा कारखान्याच्या दारात हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मी आंदोलन केले म्हणूनच एफआरपीप्रमाणे भाव द्यावा लागला. मांजरा परिवारापेक्षा गूळ पावडरचे कारखाने उसाला जास्त भाव देत आहेत. त्यामुळे कुणीही घाबरण्याचे कारण नाही. यापुढे उसाच्या टिपराचे राजकारण चालू देणार नाही, असा इशारा आमदार कराड यांनी दिला.
लाडकी बहीण फसवी योजना आहे, पैसे मिळणार नाहीत, असा अपप्रचार करून काँग्रेसवाल्यांनी महिलांची दिशाभूल केली. मात्र, महिलांच्या खात्यात पैसे जमा होताच त्यांचे तोंड बंद झाले. लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदाराला सामान्य जनतेशी काहीही घेणे-देणे नाही.
विकासकामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतः काहीच करायचे नाही आणि मी केलं मी केलं हे माझ्यामुळे झालं, असे सांगून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सातत्याने केल्याचा आरोपही आमदार कराड यांनी केला. काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी या निष्क्रिय माणसाला संधी दिली, हे तुमचे दुर्दैव आहे, असेही आमदार कराड म्हणाले.
उसात पाचट अधिक असल्याचे सांगून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या मांजरा कारखान्याला पाचट कपातीचे प्रकरण अंगलट येणार आहे, लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना पाचट कपातीचे पैसे सणासाठी आम्ही देत आहोत, अशी उपकाराची भाषा केली जाते.
पैसे द्यायचेच होते तर कपात का केली? याबाबत आवाज उठवला नसता तर त्यांनी शेतकऱ्याचे पैसे हडप केले असते असे सांगून उसाची रिकव्हरी 12 ते13 टक्के असताना आताच का कमी येऊ लागली. ऊस तोच, शेतकरी तोच, जमीन तीच, पाणी तेच मग कशात बदल झाला असा प्रश्न उपस्थित करून आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आमदार कराड यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.