Latur DCC Bank : धीरज देशमुखांच्या अध्यक्षपदाला थेट आव्हान; अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

Dhiraj Deshmukh chairman disqualification complaint : लातूर डीसीसी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्यात आले आहे. त्यांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Latur DCC Bank Election
Latur DCC Bank ElectionSarakrnama
Published on: 
Updated on: 

Latur politics : लातूर जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीनंतर काल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड झाली. धीरज देशमुख यांची दुसऱ्यांदा बँकेचे अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली. याचा आनंदोत्सव लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते करत असतानाच अवघ्या 24 तासात विरोधी पॅनलच्या संचालकाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धीरज देशमुख यांच्या अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवला. त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने 19 पैकी 15 जागा जिंकत सत्ता मिळवली. तर भाजपसह इतर विरोधकांच्या परिवर्तन पॅनेलला चार जागा मिळाल्या. जिल्हा बँकेच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही पुरेसे आहोत, असा इशारा देत नवनिर्वाचित संचालक अरविंद पाटील निलंगेकर यांनी भविष्यात पेटणाऱ्या संघर्षाचे संकेत दिले होते. धीरज देशमुख यांची अध्यक्षपदावर निवड होताच त्याचा पुढील अंक सुरू झाल्याचे दिसून आले आहे. देशमुख विरुद्ध निलंगेकर या नव्या वादामुळे जिल्हा बँकेचा कारभार येणाऱ्या काळात कसा चालणार याची झलक या निमित्ताने पाहायला मिळाली, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

Latur DCC Bank Election
Pune ZP News: सुनेत्रा पवारांचा निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरला! ZP सदस्यांना फक्त 20 टक्के; आमदारांना दुप्पट वाटा

बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक धीरज विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील तरतुदींचा आधार घेत त्यांना अध्यक्षपदासाठी अपात्र ठरवून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात २५ नोव्हेंबर २०२६ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लातूर जिल्हा बँकेच्या एका संचालकाने ही हरकत दाखल केली आहे. तक्रारदार स्वतः बँकेचे निवडून आलेले संचालक असून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धीरज देशमुख हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (अ) (७) तसेच संबंधित तरतुदींनुसार अध्यक्षपदासाठी अपात्र असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

धीरज देशमुख हे इंडो होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड, इव्होल्यूशन आर्किटेक्चरल डिझाइन स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड, हेड अँड टेल्स एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि किंग ऑफ हार्ट्स स्टड फार्म प्रायव्हेट लिमिटेड या चार खासगी कंपन्यांमध्ये संचालक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या कंपन्यांमधील त्यांचे संचालकपद, भागभांडवलातील हितसंबंध, व्यवस्थापनातील जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष सहभाग यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदास पात्र नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार त्यांचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Latur DCC Bank Election
Teachers News : गुरुजी संतापले! अशैक्षणिक कामांवर बहिष्कार, शिक्षक संघटनांनी घेतला मोठा निर्णय

नातेवाईकांशी संबंधित कंपन्यांना कर्ज दिल्याचा आरोप

धीरज देशमुख हे २०२१ ते २०२६ या कालावधीत लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंधित कंपन्यांना बेकायदेशीररीत्या कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड यांच्यासह अन्य संबंधित कंपन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

या कर्जपुरवठ्याच्या अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँकेने लातूर जिल्हा बँकेला आठ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता आणि बँकेने तो दंड भरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तत्कालीन अध्यक्षांच्या कार्यकाळातील हा प्रकार बँकेच्या कामकाजावर लागलेला कलंक असल्याचा दावा करत बँकेच्या आर्थिक अडचणींसाठी धीरज देशमुख यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज फेटाळण्याची मागणी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ (अ) (७) तसेच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील कलम १० (अ) (२) (ब) यांचा आधार घेत धीरज देशमुख हे लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी पात्र नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार त्यांचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ॲड. अमित एस. रोडे यांच्यामार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या हरकतीवर काय निर्णय घेतात, याकडे लातूर जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.