

Pune News : अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा, सातत्याने येणारे प्रशासकीय आदेश आणि रात्री-अपरात्री येणाऱ्या सूचनांमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आता थेट असहकाराचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून अध्यापनात अडथळा ठरणाऱ्या ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्यासह प्रशासकीय व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याची आक्रमक भूमिका विविध शिक्षक संघटनांनी घेतली आहे.
पुण्यातील शिक्षक भवन येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा ऑनलाइन माहिती संकलन, विविध योजनांचे अहवाल आणि प्रशासकीय कामांमध्ये अधिक वेळ खर्च करावा लागत असल्याची तक्रार या बैठकीत पुढे आली. प्रशासनाकडून व्हॉट्सॲप ग्रुपवर रात्री-अपरात्रीही सूचना आणि आदेश पाठवले जात असल्याने शिक्षकांवरील मानसिक ताण वाढला आहे. याचा थेट परिणाम वर्गातील अध्यापनावर होत असल्याचा मुद्दा संघटनांनी लावून धरला.
शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्याची भूमिका शासनाने घेतली असली, तरी प्रत्यक्षात जिल्हास्तरावर विविध कामांची जबाबदारी शिक्षकांवरच सोपवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संचमान्यता धोरण, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भातील शासनाची भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबतची धोरणे, शाळांमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या याबाबत देखील तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली.
वेगवेगळ्या संघटनांनी स्वतंत्रपणे आंदोलने करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता राज्यातील सर्व संघटनांनी एकत्र येत लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. १ डिसेंबरपासून असहकाराची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.