Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेचे राजकारण पेटले, सहकार मंत्र्यांवर आरोप होताच पुत्र सुरज पाटील मैदानात; संभाजी पाटील निलंगेकरांवर पलटवार!

Suraj Patil hit back at Sambhaji Patil Nilangekar over allegations concerning Latur DCC Bank: लातूर जिल्हा बँकेच्या कारभारावरून संभाजी पाटील निलंगेकरांच्या आरोपांना सूरज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या बचावासाठी त्यांनी निवडणुकीवरून विरोधकांना थेट आव्हान दिले.
Latur DCC Bank Election
Latur DCC Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Politics : लातूर जिल्हा बँक व संचालक मंडळावर आरोप करत बँकेच्या कारभाराची चौकशी झाल्यानंतरच निवडणुक घेतली जावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती. यावर आता मंत्री बाबासाहेब पाटील यांचे पुत्र सुरज पाटील यांनी निलंगेकर याच्यावर पलटवार केला.

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह काही संचालकांच्या दहा वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ संचालक असल्याच्या मुद्यावरून त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे सांगत त्यांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. त्यानंतर आरबीआयने बाबासाहेब पाटील यांच्यासह बँकेच्या दहा संचालकांचे पद बडतर्फ करण्याची कारवाई केली. तेव्हापासून लातूर जिल्हा बँकेच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलांना टार्गेट केल्याचा आरोप होत असतानाच आता वडीलांच्या बचावासाठी पुत्र सूरज पाटील हे मैदानात उतरले आहेत.

सुरज पाटील यांनी निलंगेकरांवर टीका करताना म्हणाले, साहेब आरोपांच्या रोपांची खेळी करून राजकारणात मोठं होता येत नाही; जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. साहेबांवर चिखलफेक करणार्‍यांनी हे लक्षात ठेवावे की, साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी अर्पण केले आहे.

गावपातळीवरील सोसायटीच्या निवडणुकीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जनतेसाठी जास्तीत जास्त कसा होईल या एकाच ध्येयाने प्रेरित आहे. जिल्हा परिषद सदस्य, उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष व अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना ते समाजकारण कधीच विसरले नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले.

अशा या लोकनेत्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन निराधार आरोप करणाऱ्या विरोधकांना आता आरसा दाखवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने दुष्काळ निवारणालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, पण सहकार विभागातील 'निवडणूक प्राधिकरण' ही एक स्वायत्त संस्था आहे, हे साधे प्रशासकीय ज्ञान विरोधकांना नाही का? असा सवाल सूरज पाटील यांनी आपल्या सोशल मिडियाच्या पोस्टमधून केला आहे.

Latur DCC Bank Election
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना 2.5 लाख पगार, प्राॅपर्टी किती?

प्राधिकरणाने कोर्टात त्यांचे वेळापत्रक मांडले, यात साहेबांचा वैयक्तिक स्वार्थ कुठून आला? केवळ राजकीय पोटशूळ आणि द्वेषापोटी विरोधक लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकांसंदर्भात हा खोटेपणाचा बाजार मांडून जनतेची दिशाभूल करत आहेत.

१२ कारखान्यांना कर्ज देण्याच्या भूलथापा मारणाऱ्यांनी लक्षात घेतल पाहीजे की, जिल्हा सहकारी बँकेचे कामकाज नियम आणि कठोर आर्थिक निकषांवर चालते. एका कुटुंबाच्या मनमानीने ते चालत नाही.

बँकेच्या ४ कार्यकर्त्यांनी पारदर्शक निवडणुका व्हाव्यात म्हणून कोर्टात धाव घेतली. हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे. या कायदेशीर प्रक्रियेचा संबंध साहेबांच्या 'शपथेच्या भंगाशी' जोडणे, हा निव्वळ खुंटलेला राजकीय अजेंडा आहे. बँकिंगचे साधे नियमही माहीत नसलेल्यांनी असे बालिश आणि बिनबुडाचे आरोप करणे आता तरी थांबवावे अशी टीका पाटील यांनी केली.

मग निवडणुकीला का घाबरता?

जर बँकेचे कामकाज खरोखरच इतके 'पारदर्शक' आणि 'शेतकरी हिताचे' आहे, तर मग तुम्ही लोकशाही प्रक्रियेला म्हणजेच निवडणुकांना एवढे का घाबरत आहात? दुष्काळाची ढाल करून निवडणुका लांबवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्तेला चिकटून राहणे हा तुमचा खरा डाव लातूरच्या जनतेने ओळखला आहे.

माझे विरोधकांना आवाहन आहे, खोट्या आरोपांच्या पडद्यामागे लपून राजकारण करण्यापेक्षा हिंमत असेल तर मैदानात या आणि निवडणुकींना सामोरे जा, बाबासाहेब पाटील साहेबांचे कार्यकर्ते तुमच्या प्रत्येक खोटारडेपणाला जशास तसे उत्तर देण्यास खंबीरपणे सज्ज आहेत, असा इशारा सूरज पाटील यांनी दिला.

काय आहेत निलंगेकरांचे आरोप?

शेतकऱ्यांच्या नावावर घेतल्या जाणाऱ्या कर्जातील 80 टक्क्यांहून अधिक रक्कम स्वतःच्या संस्थांकडे वळवली जाते, असा निलंगेकरांचा आरोप होता. शेतकऱ्यांना कर्ज देताना 20 टक्के रक्कम डिपॉझिट म्हणून कापण्यात आली आणि त्यातून सुमारे ₹2,500 कोटी जमा झाले; हे पैसे नेमके कुठे गेले?, असा सवाल त्यांनी केला.

लातूर जिल्हा बँकेच्या कर्जवाटपाची आणि एकूण कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत बँकेवर प्रशासक नेमावा आणि त्यानंतरच निवडणूक घ्यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तसेच निष्पक्ष निवडणूक झाली तर देशमुख कुटुंबाचे डिपॉझिट जप्त होईल, असे आव्हानही निलंगेकर यांनी दिले होते.

Latur DCC Bank Election
Vilas Ghule Case : विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीवर रुग्णालयातच हल्ला; CCTV फुटेज आले समोर

बाबासाहेब पाटलांची काँग्रेसला साथ?

सहकारमंत्र्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कायद्याचा दुरुपयोग केला. शिवाय काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्षरित्या महायुतीतील घटक पक्ष असून पाटील हे मदत करत असल्याचा आरोपही निलंगेकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील अंतर्गत गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com