

Marathwada Politics : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्जाची छाननी झाल्यानंतर बँकेचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासमोरील उमदेवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे देशमुख हे आता बिनविरोध आल्यात जमा आहेत. माजीमंत्री दिलीपराव देशमुख देशमुख यांनी सुरवातीलाच ही विरोधकांना चपराक दिली आहे. अर्जाच्या छाननीत बँकेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांचा अर्ज मात्र बाद झाला आहे. या निवडणुकीत 48 उमेदवारांवर आक्षेप होते, त्या पैकी 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 19 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात सोमवारी (ता. 19) अर्जाच्या छाननीचा दिवस होता. त्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी 48 उमेदवारांवरील सर्व आक्षेप स्वीकारले होते. लेखी तसेच तोंडी म्हणणे देखील त्यांनी ऐकून घेतले होते. त्यानंतर मंगळवारी विजयादशमीची सुटी आली. त्यामुळे बुधवारी (ता. 21) त्यांनी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात एकूण पंधरा उमेदवाराचे अर्ज बाद ठरले आहेत. यात दोन उमेदवारांचे दोन मतदारसंघात अर्ज होते, ते बाद ठरले आहेत. त्यामुळे एकूण 13 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेले आहेत.
विद्यमान अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी बीज प्रक्रिया मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भरत चामले व सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. या दोघांचे अर्ज बाद झाल्याने धीरज देशमुख यांच्या विरोधात उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आल्यात जमा आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर ते अधिकृत जाहीर होईल.
निलंगेकरांना मात्र फटका
बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक अशोक पाटील निलंगेकर यांना मात्र सलग दहा वर्ष संचालक राहिल्यानंतर निवडणूक लढवता येणार नाही या शासनाच्या निर्णयाचा मात्र फटका बसला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे,पण त्यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या आहेत.
आमदार कराडांचा अर्ज वैध
या निवडणुकीत आमदार रमेश कराड (Ramesh karad) तसेच अरविंद पाटील निलंगेकर यांच्यावरही आक्षेप घेण्यात आले होते. या दोघांच्या अर्जाचे काय होणार याकडे लक्ष लागले होते. पण कराड व निलंगेकर या दोघांचे अर्जही वैध ठरले आहेत. तसेच आमदार कराड यांचे पूत्र ऋषिकेश कराड यांचाही अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे ही निवडणूक पिता व पुत्र दोघेही लढणार की एक जण अर्ज मागे घेणार? याकडे लक्ष लागले आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पत्नी शोभा पवार यांना या निवडणुकीत उतरवले आहे. महिला प्रतिनिधी व औसा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेला नव्हता. त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत.आता त्या कोणत्या मतदारसंघातून उभे राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अबोली जाधवांचा अर्ज बाद
माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांची कन्या अबोली जाधव यांनी दोन मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. ज्या संस्थेतून त्यांनी अर्ज दाखल केला आहे, तेथे दोन वर्ष संचालक व तीन वर्षाचा सहकारातील अनुभव असणे आवश्यक असते, या नियमामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून अशोक पाटील निलंगेकर (निलंगा), विठ्ठलराव रामराव पाटील (निलंगा), सोनाली प्रमोद पाटील (उदगीर), धर्मपाल अण्णराव देवशेट्टे (जळकोट), अबोली विनायकराव जाधव (अहमदपूर), गोविंद ग्यानोबा माकणे (चाकूर) याचे अर्ज बाद झाले आहेत.
तर बीज प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून भरत चामले (उदगीर) व सचिन सुभाष पाटील (औसा), नागरी बँका व सहकारी पतसंस्था मतदारसंघातून भीमाशंकर राचट्टे (औसा), मत्स्य सहकारी संस्था मतदारसंघातून सतीश शेषेराव जाधव (लातूर), अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघातून राणी शिवलीकर (औसा), इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघातून भरत चामले, अमित शेळके (लातूर) तर महिला प्रतिनिधी मतदारसंघातून मनोरमा पाटील (निलंगा), अबोली विनायकराव जाधव (अहमदपूर) या उमेदवारांचे अर्ज विविध कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नेटके यांनी बाद केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.