Latur News, 15 Nov : राज्यात नावलौकिक मिळवलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १५) शांततेच्या वातावरणात मतदान झाले. या निवडणुकीत ९९९ पैकी ९९३ जणांनी (९९.४० टक्के) मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत मतदारराजाने आपला कौल कुणाला दिला, याचे चित्र सोमवारी (ता. १६) स्पष्ट होणार आहे. देशमुख बंधू आपली सत्ता कायम ठेवणार की निलंगेकर बंधू परिवर्तन घडवून आणणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याच्या सहकार आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या लातूर जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल उतरले होते.
त्यांच्यासमोर भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार बसवराज पाटील, आमदार रमेश कराड, आमदार संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखालील आणि अरविंद पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनल’ने आव्हान उभे केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालय (तळमजला) येथे होणार आहे. सकाळी ६ पासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
चार उमेदवार बिनविरोध
संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी ४ उमेदवार हे पूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यात सहकार पॅनलमधील सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव (अहमदपूर), भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार (औसा), सर्जेराव मोरे, विवेक शिरसाठ यांचा समावेश आहे.
१५ जागांसाठी मतदान
१५ जागांसाठी जिल्ह्यातील १० मतदान केंद्रांवर रविवारी निवडणूक झाली. सकाळी आठला मतदानाला सुरवात झाली. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच बहुतांश मतदारांनी मतदान केल्याचे दिसून आले. असे असले तरी सायंकाळी चारपर्यंत मतदान केंद्राबाहेर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी होती. ९९९ पैकी ९९३ जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
देशमुख बाजी मारणार?
विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख आणि भरत चामले यांच्यातील लढतीत देशमुख बाजी मारणार, असा अंदाज वर्तवला जात आहे.तर निलंगा सोसायटी मतदारसंघात संभाजी पाटील-निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील आणि अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील या काकी-पुतण्यातील लढतीबरोबरच नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघात आमदार रमेश कराड यांचे पुत्र ऋषीकेश कराड आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गोविंदपूरकर यांच्यात चुरशीची लढत असून यात कोण बाजी मारणार, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
काँग्रेसने मतदारांना आणले बसमधून
निवडणूक प्रचारादरम्यान ‘भाजप’वर अपहरणाचे आरोप झाले होते. औराद शहाजनी येथे तीन मतदारांचे अपहरण झाल्याची तक्रार करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसने केली होती. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे. या घडामोडीनंतर काँग्रेसने अत्यंत सावध भूमिका घेतली. समर्थक मतदारांना एकत्रितपणे मतदानाच्या दिवशी खासगी बसमधून लातुरातील मतदान केंद्रावर आणले.
स्वत: विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार धीरज देशमुख हेही या बसमध्ये होते. काँग्रेसने घेतलेली खबरदारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, मतदान केंद्रावर अचानक वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी विनंती केल्यानंतर आम्ही एकत्रितपणे एका वाहनात आलो असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
ऋषीकेश कराड आणि पोलिसांत बाचाबाची
आमदार रमेश कराड यांचे पुत्र व निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमदेवार ऋषीकेश कराड आणि पोलिसांत बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. लातुरातील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रविवारी ही घटना घडली. घटनेनंतर ‘आमच्यासोबत नीट बोलायचं, वाद घालायचा नाही’, असे पोलिस अधिकारी हे कराड यांना सांगत असतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाला. याबाबत कराड यांच्याकडून कसलेही स्पष्टीकरण आले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.