Pune News, 15 Nov : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल' या आगामी चित्रपटामुळे सध्या मनोरंजन विश्वासह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आलेय. या पोस्टद्वारे चाकणकरांनी काही दावे केले आहेत. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत चाकणकर यांना काही सवाल केले आहेत.
पोस्टमधून चाकणकरांचा नेमका काय दावा?
रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणताही वापर केल्यास, तसेच अशोक खरात प्रकरणात नाव आल्याने मला थेट पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि माझ्यावर गंभीर आरोप करण्यात आले.
आता यावर चित्रपट, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.
यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "गालिब यांचा एक अतिशय सुंदर शेर आहे. 'कुछ किया करो, कुछ किया करो और कुछ ना ही कर सके तो अपना ही पाजामा फाड़ कर फिर उसे सिया करो, पर कुछ किया करो.' चाकणकरबाईंच्या आजच्या कृतीने नेमका हा शेर आठवला. कारण त्यांना अशा टाकाऊ आणि दळभद्री आयडिया कोण सुचवते, हे कळत नाही. कदाचित आपण फारच प्रसिद्धीमुख झालो आहोत आणि अधूनमधून आपण आउटडेटेड नाही, हे सांगण्यासाठी त्यांना स्वतःभोवती असे वाद ओढवून घ्यायला आवडत असावेत," अशी खोचक टीका त्यांनी केली.
अंधारे पुढे म्हणाल्या, ट्रेड म्हणजे व्यापार. ट्रेड वस्तूंचा असतो. व्यापार वस्तूंचा होतो, व्यक्तींचा होत नाही. ट्रेडमार्क कुठल्याही उत्पादनासाठी असतो, व्यक्तीसाठी नाही. एखाद्या व्यक्तीची लकब, शैली, प्रतीक लोकांनी स्वीकारले, तरीसुद्धा ती जगण्याची प्रेरणा म्हणून उचलली जातात. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांची चंद्रकोर असेल, बाबासाहेबांची लेखणी, घरातले पुस्तकांचे भांडार, ग्रामस्वच्छता अभियानासाठी संत गाडगेबाबांचा नामोल्लेख किंवा राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी महात्मा गांधीजींचा चष्मा या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणून लोकांकडून वापरल्या जातात.
तसेच, खूप लोक पवारसाहेबांसारखे घड्याळ वापरतात, बहन मायावतींसारखी केशभूषा आणि वेशभूषा करायला बघतात. त्यातून त्यांना जगण्याची प्रेरणा मिळते आणि त्यावर कधी कुणी आक्षेपही घेत नाही. चाकणकरबाईंना नेमका आक्षेप का वाटतोय? त्या स्वतःभोवती असे वाद पुन्हा पुन्हा का ओढवून घेतात? स्वतःलाच विनाकारण अशा वादांमध्ये ठेवण्यामध्ये त्यांचा नेमका काय इंटरेस्ट आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.