Shiv sena-BJP News : 'स्थानिक'मध्येही नेत्यांची घराणेशाही! सत्तार, मुटकळेंची मुलं, तर बांगरांची भावजय मैदानात!

Marathwada Local Body Election : कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे सांगणाऱ्यांचा हा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. यावर राज्यातील बडे नेते अंकुश ठेवतात का? यावरच कार्यकर्त्यांना किती न्याय मिळतो? हे अवलंबून आहे.
Abdul Sattar-Tanhaji Mutkule-Santosh Bangar On Local Body Election News
Abdul Sattar-Tanhaji Mutkule-Santosh Bangar On Local Body Election NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अनेक नेत्यांनी आपल्या घरातील सदस्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

  2. सत्तार, बांगर आणि मुटकुळे कुटुंबीयांच्या उमेदवारांच्या नावांवरून राजकीय वातावरण तापले आहे.

  3. विरोधकांचा आरोप – “लोकशाही नामशेष, घराणेशाही सर्वोच्च!” तर समर्थकांचे म्हणणे – “जनतेला जे आवडेल तेच ठरवतील.”

Local Body Election 2025 : कार्यकर्त्यांनी कायम सतरंज्याच उचलायचा का? असा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत विचारला जातो. मात्र याकडे स्थानिक आणि राज्यातील नेतेही फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे भाऊ- दादांसाठी सतत राबणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, अशी भावना कार्यकर्त्यांची होऊ लागली आहे. राजकारणातील घराणेशाही आणि नात्यागोत्याची परंपरा सत्तार, बांगर, मुटकुळे या आमदारांनी पुढे सुरू ठेवली आहे. यात आणखी कोणत्या नेत्यांची नावे येणाऱ्या काळात समोर येतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणांमधून 'तुम्ही आमच्यासाठी खूप राबलात, आता आमची वेळ आहे. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी असतात. तुम्ही आमच्यासाठी कष्ट घेतले आता आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू' असं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगीतले. प्रत्यक्षात मात्र स्थानिक पातळीवर युती आघाड्यांचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते हे मनमानी करताना दिसत आहेत.

कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे सांगणाऱ्यांचा हा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. यावर राज्यातील बडे नेते अंकुश ठेवतात का? यावरच कार्यकर्त्यांना किती न्याय मिळतो? हे अवलंबून असणार आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपल्या भावाच्या बायकोला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकूळे यांनी देखील आपल्या कुटुंबातील व्यक्तीला मैदानात उतरवले आहे.

Abdul Sattar-Tanhaji Mutkule-Santosh Bangar On Local Body Election News
Arjun Khotkar firecracker comparison : फडणवीस, शिंदे अन् पवार 'सुतळी बॉम्ब', उद्धव वाजलाच नाही, राज 'स्फोटक', तर राऊत 'भुई चक्कर'; अर्जुन खोतकरांनी फोडले फटाके

कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणत स्वबळाची भाषा करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी घराणेशाही आणि नात्यागोत्याचे राजकारणच पुढे केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. विधानसभा, लोकसभा नेत्यांच्या निवडणुका होत्या, मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महापालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं छातीठोकपणे सांगणारे नेतेच आपला मुलगा, भावजय, पुतण्या, पत्नी, बहीण यांच्यासाठी पुढे सरसावले आहेत.

Abdul Sattar-Tanhaji Mutkule-Santosh Bangar On Local Body Election News
Abdul Sattar : मुलाला नगराध्यक्ष करण्यासाठी अब्दुल सत्तार स्वबळावर मैदानात; विरोधक रोखणार का?

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा मुलगा समीर सत्तार याची उमेदवारी जाहीर करत प्रचारही सुरू केला आहे. तिकडे हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सख्ख्या भावजय यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपचे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या फाळेगाव सर्कल मधून उमेदवारी जाहीर करत कामाला लावले आहे.

नेत्यांचे स्वबळ नातलगांसाठी..

घराणेशाही आणि नात्यागोत्यातले उमेदवार देऊन सत्ता आपल्याच हाती राखण्याचा प्रयत्न ही नेतेमंडळी करताना दिसत आहेत. सिल्लोड आणि हिंगोली मधून याची सुरुवात झाली असली तरी मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागांमध्येही हे लोण येत्या काही दिवसात पसरल्यास नवल वाटू नये. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याची सुरुवात देखील मराठवाड्यातील सिल्लोड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून झाली आहे.

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. तर हिंगोलीत संतोष बांगर यांनीही स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडी आणि युतीतील घटक पक्षांनाच आव्हान दिले आहे. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. आता या नेत्यांचे स्वबळ नेमके कार्यकर्त्यांसाठी आहे की मग आपल्या नातलगांना राजकारणात आणून सत्तेची सगळी सूत्र आपल्या हाती ठेवण्यासाठी? हा खरा प्रश्न आहे.

FAQs

1. प्रश्न: स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कोणत्या कुटुंबांचे उमेदवार चर्चेत आहेत?
उत्तर: सत्तार, बांगर आणि मुटकुळे या तीन प्रमुख राजकीय कुटुंबांचे उमेदवार चर्चेत आहेत.

2. प्रश्न: या उमेदवारांवर घराणेशाहीचे आरोप का होत आहेत?
उत्तर: कारण सर्व उमेदवार हे विद्यमान नेत्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे लोकशाहीपेक्षा कौटुंबिक राजकारण वाढत असल्याची टीका होते.

3. प्रश्न: विरोधकांनी या मुद्द्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
उत्तर: विरोधकांचा आरोप आहे की “ही लोकशाही नसून घराणेशाहीचा महोत्सव आहे.”

4. प्रश्न: समर्थक काय म्हणतात?
उत्तर: समर्थकांचे म्हणणे आहे की उमेदवार जनतेने निवडायचे आहेत; त्यामुळे घराणेशाहीचा प्रश्नच नाही.

5. प्रश्न: या वादामुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का?
उत्तर: राजकीय विश्लेषकांच्या मते, मतदारांची नाराजी किंवा सहानुभूती या दोन्हींचा परिणाम मतदानात दिसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com