Loksabha Elelction 2024 : महाविकास आघाडीचं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांनी काय कमावलं? असा प्रश्न लोकसभा निवडणुकीत उठाव केलेल्या आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे आणि त्यांच्या शिलेंदारांकडे बघून पडतो.
राज्यात तर मुख्यमंत्रिपद असूनही एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत उठाव केलेल्या 40 आमदार, त्यांना साथ देणाऱ्या 12 खासदारांना भाजपचे राज्य आणि दिल्लीतील नेते खेळवत असल्याचे चित्र राज्याचा राजकारणात दिसत आहे. मराठवाड्याचा विचार केला तर शिवसेनेत फुट पडण्याआधी म्हणजे युती असतांना लोकसभेचे आठ पैकी चार मतदारसंघ ठाकरेंच्या वाट्याला यायचे, म्हणजे निम्मा मराठवाडा.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यात संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या मतदारसंघांचा समावेश होता. शिंदेंच्या उठावानंतर आणि खरी शिवसेना म्हणून नाव, धनुष्यबाण मिळाल्यानंतर सध्या हिंगोली हा एकमेव मतदारसंघ भाजपने त्यांना दिला आहे. त्यात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी त्यांना मागे घ्यावी लागली. परभणीची जागा महायुतीचे रासपला दिली, तर धाराशिव मध्ये राष्ट्रवादीने हक्क सांगत अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
नांदेड, जालना, लातूर, बीड या भाजपकडे असलेल्या जागा त्यांनी सर्वात आधी उमेदवार जाहीर केल्या. म्हणजेच महायुतीतील घटक पक्षांसाठी जागा सोडण्याची जबाबदारी फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टाकण्यात आली. परिणामी परभणी आणि धाराशिवच्या जागेवर दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागली. परभणीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपच्या जानकरांना द्यायला लावून भाजपने आपले संख्याबळ कसे वाढेल? याची तजवीज करून ठेवली.
तर तिकडे धाराशीवमध्ये भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायला लावत त्यांना मैदानात उतरवले. इथे शिवसेना शिंदे गटाचा हक्क असतांना त्यांना ही जागा राष्ट्रवादीला सोडावी लागली. एकूणच महायुतीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शिंदे गटाचे? असेच आतापर्यंतच्या मराठवाड्यातील लोकसभा जागावाटपावरून स्पष्ट होते.
भाजपने(BJP) स्वतःच्या चार आणि जानकरांच्या रुपाने परभणी अशा पाच लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवले आहेत. या शिवाय भाजपचा डोळा छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही आहे. शिवसेना शिंदे गट या जागेसाठी अडून बसल्यामुळे भाजपने एक पाऊल मागे घेत जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण स्थानिक भाजपच्या नेत्यांना आक्रमक भूमिका घेत शिंदेच्या उमेदवाराला विरोध दर्शवण्याची दुसरी खेळीही सुरू ठेवली आहे.
संभाजीनगरची जागा शिंदे गट आपल्याकडे राखू शकला तर मराठवाड्यात थोडीफार इभ्रत राखली जाईल. पण शेवटच्या क्षणाला भाजपने ही जागाही खेचून घेतली तर मात्र मराठवाड्यात आणि ज्या संभाजीनगर जिल्ह्याने शिंदेंना सर्वाधिक साथ दिली त्या हक्काच्या मतदारसंघातही शिंदे गटाची नाचक्की होईल.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नुकतीच मुंबईत शिवतीर्थ या राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांच्यासाठी आम्ही काय रेड कार्पेट टाकायला तयार असल्याचे शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. पण शिवसेनेच्या पायाखालचं हळूहळू सगळच निसटतं चाललंय त्याचं काय? असा सवाल या निमित्ताने केला जातोय.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.