Teacher's News : ऐन गणेशोत्सवात शिक्षकांवर विघ्न; मुख्यालयी राहत नसल्याने वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखली!

Sambhaji Nagar Teacher News : मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाची कारवाई; शिक्षकांची वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याचा निर्णय चर्चेत. गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Teacher
Teacher Sarkarnama
Published on
Updated on

Sambhaji Nagar Teacher News : मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाईचा दंडूका उगारत दणका दिला आहे. गंगापूर-खुलताबद तालुक्यातील तब्बल १०८६ शिक्षकांवर हे कारवाईचे विघ्न आले आहे. गंगापूरचे ७५३ आणि खुलताबादचे ३३३ शिक्षकांची एक वार्षिक वाढ पुढील तीन वर्षांसाठी रोखण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे विद्यमान भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा मुद्दा गेल्या दोन वर्षांपासून हाती घेतला आहे. शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगत या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी बंब यांनी विधीमंडळामध्ये वारंवार केली होती.

यावरून राज्यभरात प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक संघटना, पदवीधर, शिक्षक आमदार चांगलेच संतापले होते. गेल्या वर्षी बंब यांच्याविरोधात शिक्षकांनी मोर्चाही काढला होता. परंतु बंब यांनी आपल्या मुद्यावरून माघार न घेता उलट आक्रमकपणे मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरोधात कारवाईसाठी आग्रह धरला.

बंब यांनी हा विषय संपूर्ण राज्यातील शिक्षकांना उद्देशून हाती घेतला आहे. परंतु कारवाईची सुरूवात त्यांनी आपल्या मतदारसंघातूनच केल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील मुख्यालयी न राहणाऱ्या मुख्याध्यापक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व सहशिक्षकांना आर्थिक दणका देणाऱ्या या निर्णयाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या कारवाईच्या विरोधात उद्या १५ सप्टेंबर रोजी शिक्षक संघटनांनी गंगापूर येथे एल्गार मोर्चाची घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सावात हा वाद पुन्हा एकदा पेटताना दिसतो आहे. मुख्यालयी वास्तव्यास असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव सादर न केल्याप्रकरणी दोन्ही तालुक्यांतील तब्बल १,०८६ शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी तात्पुरती बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढले आहेत.

Teacher
Asaduddin Owaisi on UCC : अमित शाहांचा UCC निर्धार; ओवैसींचा थेट पलटवार, म्हणाले- ‘मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा हेतू’

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने ११ सप्टेंबर २०२६ रोजी हे आदेश जारी केले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या आदेशामुळे संबंधित शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. शासन निर्णय व जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या पत्रव्यवहारानुसार, संबंधित शिक्षकांनी आपल्या नियुक्तीच्या गावात मुख्यालयी वास्तव्यास असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव सादर करणे अपेक्षित होते. मात्र, काही शिक्षकांनी हा ठराव सादर केला नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ३० जून २०२२ रोजी परिपत्रक काढले होते. त्यानंतर गंगापूर व खुलताबाद पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शिक्षकांना ग्रामसभेचा ठराव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मात्र, वारंवार सूचना करूनही ठराव सादर न करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या शिक्षकांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील नियम ४ (२) नुसार कारवाई करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांची एक वार्षिक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरूपात तीन वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या आगामी वेतनवाढीवर परिणाम होणार असून, त्याचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागणार आहे.

नोटीस, खुलासा अन् कारवाई

मुख्यालयी वास्तव्यास असल्याबाबत ग्रामसभेचा ठराव सादर न केल्याने संबंधित शिक्षकांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या नोटिसीला शिक्षकांनी आपले लेखी खुलासे सादर केले होते. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गंगापूर व खुलताबाद यांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर प्राथमिक शिक्षण विभागाने वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Teacher
Solapur Dcc Bank : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी 2165 ठराव; परिचारकांच्या पंढरपुरात सहकाराचे सर्वाधिक 181 ठराव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com