

पांडुरंग उगले
Marathwada Politics : बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची उंची अर्धा मीटरने वाढवण्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि आयुष्यमान भारतचे महाराष्ट्र प्रमुख डाॅ. ओमप्रकाश शेटे यांनी या संदर्भात शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आता माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी शेटे यांच्या भेटीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माजलगाव धरणाची उची अर्धा मीटरने वाढविण्यासाठी शासनाने मंजुरी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याचे सांगत शेतकरी संघर्षसमितीने आमदार सोळंकेविरुद्ध रान पेटवले होते. या समितीच्या भूमिकेला पाठिंबा देत ओमप्रकाश शेटे समितीच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यानंतर धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रकश सोळंके यांनी बुधवारी पत्रकरांशी संवाद साधला. धरणाची उंची वाढवताना शेतकऱ्यांची गुंठभरही जमीन जाणार नाही, ती गेली तर आपणही संघर्ष समितीबरोबर आंदोलनात उतरू आणि धरणाची उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला विरोध करू, असे स्पष्ट केले. त्यामुळे उद्या, गुरुवारी (ता. १७) होणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाची हवाच निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शासनाने आठ दिवसापूर्वी सहा हजार ४७७ कोटी रुपयाची जायकवाडी प्रकल्प टप्पा २ माजलगाव धरणास पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता देत शासन निर्णय काढला. यात माजलगाव धरणाची अर्धा मीटरने उंची वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. माजलगाव धरणाची अर्धा मीटरने उंची वाढविल्यास शासन शेतकर्यांच्या सोन्यासारख्या जमिनी संपादित करून त्या पाण्याखाली घालणार, असा आरोप केला जात आहे.
शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यास विरोध करत धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात शेतकरी संघर्ष समितीने माजलगाव जालायाशयात जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली. या आंदोलनाला पाठींबा देत डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आंदोलाकाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेत उंची वाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
आंदोलाकाच्या आडून भाजपचे डॉ. ओमप्रकाश शेटे हे आमदार प्रकाश सोळंके यांना विरोध करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या पूर्व संध्येला आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत शासनाच्या धरण उंची वाढीचे वास्तव मांडून खुलासा केला. माजलगाव धरणाची सध्यस्थित पूर्ण संचय पातळी ४३१:८० एवढी आहे तर, अधिकाधिक महत्तम पातळी ४३४:८० एवढी आहे.
धरणाची भविष्यातील उंची वाढीचा विचार करून शासनाने त्याच वेळेस ४३४:८० संचय पातळी लक्षात घेऊन २२ गावातील जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या नवीन योजनेनुसार धरणाची केवळ अर्धा मीटर उंची वाढविल्यास परिसरातील शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन संपादित करून ती पाण्याखाली जाणार नाही. उलट उंची वाढविल्यास ३८ दशलक्षघनमीटर अधिकचा पाणीसाठा उपलब्ध होऊन तो सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी होणार आहे.
विरोधकांनी मैदानात उतरावे..
सर्वेक्षणानंतर शेतकर्यांची एक गुंठाही जमीन पाण्याखाली जाणार असेल तर, आपणही शेतकरी संघर्ष समितीला पाठींबा देत या योजनेला विरोध करू, अशी भूमिका सोळंके यांनी मांडली. तसेच विरोधकांनी निवडणुकीच्या मैदानात येऊन आपला सामना करावा, असा टोलाही शेटे यांना नाव न घेता लगावला.
ज्यांना राजकीय विरोध करायचा आहे त्यांनी निवडणूक आल्यावर मैदानात येऊन विरोध करावा. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका येतीलच, त्यावेळी विरोधकांनी माझ्यासमोर मैदानात उतरावे, कोणाची किती किंमत आहे त्याच वेळेस कळेल? विरोधाला विरोध म्हणून लोकाभिमुख योजनेला विरोध करू नये, अशा शब्दात त्यांनी शेटे यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीला सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.