Beed News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पायी दिंडी काढणार आहेत. या पायी यात्रेची घोषणा बीडच्या अंतिम इशारा सभेतूनच जरांगे-पाटलांनी केली होती. या दिंडीचा पहिला मुक्काम मातोरी गावात असणार आहे. मुक्कामी असलेल्या दिंडीतील बांधवांसाठी मातोरी भागातील गावागावांतून ठेचा - भाकरी येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारलेला असून जरांगे-पाटील यांनी याबाबतची घोषणा बीडच्या अंतिम इशारा सभेतूनच केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून मुंबईकडे जाण्यासाठी यापूर्वीच्या आंदोलन, सभांप्रमाणेच प्रतिसाद मिळेल, असे चित्र दिसत आहे.
मनोज जरांगे-पाटलांच्या बीड जिल्ह्यात मुंबईला जाण्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. मुंबईला जाण्याच्या नियोजनासाठी गावागावांत बैठका होत आहेत. जरांगे यांचे मूळ गाव असलेल्या मातोरीत अंतरवाली सराटी येथे पायीवारीचा पहिलाच मुक्काम असणार आहे. त्यामुळे दिंडीचे स्वागत आणि मुक्कामी समाजबांधवांची व्यवस्था करण्यासाठी मातोरी व परिसरातील ग्रामस्थदेखील तयारीला लागले आहेत.
अंतरवालीतून निघणारी दिंडी गेवराई तालुक्यातून शिरूर तालुक्यात येईल. मातोरी (ता. शिरूर कासार) ते जरांगे-पाटील यांचे मूळगाव आहे. या ठिकाणी मराठाबांधव मुक्कामी येणार आहेत. तत्पूर्वी दुपारचे जेवण कोळगाव (ता. गेवराई) येथे होणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत मुंबईला उपोषणाला जाण्यासाठी गावागावांत तरुणांनी वाहने, वाहनांसाठीचे इंधन, जेवणाची व्यवस्था केली आहे. त्यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे आरोग्य किट दिले जाणार आहे. गावांतील मंदिरांचे पार, समाजमंदिरांत नियोजनाच्या बैठका होत आहेत.
पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी/गारमाथा येथे चैत्र महिन्यात खंडोबाची भरणारी यात्रा दरवर्षी भव्य असते. त्यासाठी मोठी लोकवर्गणी जमा होते. यंदा हीच वर्गणी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला निघालेल्या पदयात्रेसाठी वापरण्यात येणार आहे, तर यात्रा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखाने घेतलेला आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणी उभा करण्याचे काम हाती घेतले असून मुंबईला जाण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.
Edited By : Rashmi Mane
R...