Maratha Protest News : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीवर ठाम असलेले आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन नोंदी सापडलेल्या पात्र लोकांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकार दीड महिना झोपले होते का ? आता आम्हाला वेड्यात काढता का, असे प्रश्न उपस्थित करत जरांगेंनी सरकार आणि प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता दोन दिवसात किती कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले, याची यादी द्यावी, अन्यथा मुंबईत आंदोलन करणारच, अशी ठाम भूमिकाही जरांगेंनी घेतली.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जरांगे पाटलांनी 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून वाहानांचा मोर्चा काढत मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेतली.
यावेळी जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्र देताना प्रशासनाकडून कशा प्रकारे अडवणूक केली जाते, याची माहिती दिली. तसेच दीड महिना देऊनही लोकांना प्रमाणपत्र मिळाले नाही, याकडेही लक्ष वेधले. दोन दिवसात किती प्रमाणपत्रांचे वाटप केले, याची यादी द्यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. यादी मिळाली नाहीतर आपण मुंबईतील आंदोलन करणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत मुख्य सचिवांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील 54 लाख मराठा लोकांना प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना जरांगेंनी (Manoj Jarange) मात्र सरकार आणि प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाकडे दीड महिन्याचा कालावधी होता. या काळात लोकांनी अर्जही दाखल केले. मात्र त्यांना अद्यापही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही. आमच्यावर हल्ला करणारे हेच लोक होते, आता अडवणूक करतात, असा आरोपही जरांगेंनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यात 54 लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना २० जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र द्या. त्यांच्या नातेवाईकांच्या मुद्द्यावर मार्ग शोधावा. आता सरकार दोन दिवसांत प्रमाणपत्र देऊ शकते का. दीड महिन्यात किती जणांना प्रमाणपत्रे दिली याची माहिती दिली तर विश्वास ठेवणार आहे. आता दिलेल्या दीड महिन्याच्या मुदतीत काही केले नाही, तर दोन दिवसात काय करणार. आता आदेश दिले आहेत तर कार्यवाहीही लवकर करा. तुम्ही रात्रंदिवस काम करत असल्याचे दिसले पाहिजे, तरच मुंबईतील आंदोलनाबाबत विचार करू. आदेश काढल्यानंतर प्रक्रिया चार महिने करणार, हे चालणार नाही, असेही जरांगेंनी यावेळी स्पष्ट केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.