

Dasara melava News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथून आपले उपोषण स्थगित केले. ज्या सरकारला एक दिवसही देणार नाही असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला होता. त्याच सरकारला तीन महिन्यांची मुदत दिल्याने त्यांच्या आंदोलनावर आणि भूमिकेवर शंका घेतली जात होती. मनोज जरांगे पाटील हे सरकारला मॅनेज झाल्याचे चित्र त्यांच्या विरोधकांकडून निर्माण करण्यात आले.
एकाच वेळी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मनोज जरांगे पाटील यांचे समाजातील विरोधक त्यांच्यावर तुटून पडले होते. जरांगे पाटील यांना मदत करणाऱ्या त्यांच्या जवळच्या समर्थकांवर सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणून मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला गेला. या पार्श्वभूमीवर आजच्या नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? त्यांना मराठा समाजाचा पूर्वी इतकाच प्रतिसाद मिळतो का? असे प्रश्न उपस्थित केले गेले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या नारायण गडावरील मेळाव्याला तुफान गर्दी झाली. ही गर्दी पाहून मनोज जरांगे पाटील यांना खिंडीत गाठण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला हे स्पष्ट झाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी संयमित भाषण केले, राज्यातील विशेषता मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे याची जाणीव ठेवून शेतकऱ्यांसाठीच मोठा लढा उभारण्याची घोषणा नारायण गडावरून मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजासोबतच राज्यातील शेतकऱ्यांची सहानुभूती आपल्या बाजूने वळवण्याचा त्यांचा प्रयत्न आजच्या भाषणातून दिसून आला.
समाजाला साथ न देणाऱ्या नेत्यांच्या मागे न धावता जो आरक्षणाच्या लढ्यात कामाला येईल त्याच्यामागे आपली ताकद उभी करा असे आव्हान करतानाच त्यांनी विद्यमान महायुती सरकारला २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहनही उपस्थितांना केले. सरकार विरोधातील राग व्यक्त करताना जरांगे पाटील यांची भाषा आज काहीशी मवाळ होती. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील प्रश्न याच सरकार कडून सोडवून घेण्यासाठी केलेल्या दबाव तंत्राचा एक भाग म्हणून त्यांच्या या इशाऱ्याकडे बघितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नगद नारायण गडावरून मराठा समाज बांधवांना संबोधित करताना आरक्षण प्रश्न, भीषण दुष्काळ, सध्याची राजकीय-सामाजिक परिस्थिती अशा मुद्द्यांवर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
नेत्यांच्या नादी लागू नका. त्यांना मोठे करण्यातच आपला जीव चालला आहे. पण निवडून आल्यानंतर ते आपल्याकडे पाहत नाही. माझा हा आक्रोश समाज मोठा व्हावा म्हणून आहे, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही बोलू नका, आमच्याविरोधात जाऊ नका, असे नेते सांगत आहेत. पण मी तुम्हाला धोका देणार नाही, समाजासाठी लढत राहीन, अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मी इमानदारीने काम करतोय तर माझ्याच मागे लागलेत. मराठा समाजासाठी मी काम करतोय, तर काहींना वाटतं की त्यांच्या विरोधात बोलू नये. परंतु हे शक्य होणार नाही. मी समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही. माझा समाज मोठा झाला पाहिजे. आतापर्यंत जो आपल्याविरोधात बोलला त्याचा आपण बाजार उठवलाय. जो नेता, जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल तो २०२९ ला निवडून येऊ द्यायचा नाही, असे स्पष्टपणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
राज्यात ज्याला मराठा सेवक म्हणून काम करायचे, त्यासाठी मी एक नंबर देणार आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या पण प्रमाणपत्र मिळत नाही, अर्ज केला पण प्रमाणपत्र देत नाहीत, व्हॅलिडिटी देत नाहीत त्यासंबंधीच्या प्रश्नांसाठी एक नंबर देतो. मराठा समाजाला येणाऱ्या अडचणींसाठी तुम्ही फोन करू शकता, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केले.
भानावर या किती दिवस यांचा उदो उदो करता.. यांना पैसे मोजता येईनात.. शेतीत जर पिकलं नाही तर आपण जगूच शकत नाही, असे ८० टक्के शेतकरी आहेत. शेतकरी कोणत्याही परिस्थितीत मोठा करायचा आहे. शेतकरी संकटात आहे ही सगळी लढाई आपल्याला सोबत लढायची आहे. आणखी दोन महिन्याने भयंकर परिस्थिती निर्माण होणार आहे. एक लाख रूपये हेक्टरी शेतकऱ्यांना द्यावी, यासाठी मोठा लढा उभा करतो, असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.