Congress: एकादशी ते नवरात्री! काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील 469 दिवसांचा राजकीय दुरावा संपला

Chandrapur Politics: चंद्रपूरच्या काँग्रेस राजकारणातील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील ४६९ दिवसांचा राजकीय दुरावा संपल्याचे चित्र आहे. मनोमिलनामुळे कार्यकर्ते, नगरसेवक आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
Vijay Wadettiwar, Pratibha Dhanorkar
Vijay Wadettiwar, Pratibha DhanorkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrapur Political News: काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे तब्बल ४६९ दिवसांनंतर अधिकृत मनोमीलन झाले. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांमधील वाद नवा नाही. अधूनमधून तडजोडी होतात, मनोमीलन होते आणि काही दिवसांत पुन्हा विघटनही होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीला विठुरायांच्या साक्षीने दोन्ही नेत्यांची हातमिळवणी झाली होती. मात्र, निवडणूक संपताच एकादशीचा गोडवा संपला आणि राजकीय कटुता पुन्हा उफाळली.

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या काळात या वादाने टोक गाठले. आता १८ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रीच्या उत्साहात दोन्ही नेते पुन्हा एकत्र आले आहेत. या नव्या मनोमिलनाच्या संभाव्य परिणामांविषयीची ही काही निरीक्षणे

दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद मिटल्यामुळे एकमेकांविरोधात तक्रारी, आरोप-प्रत्यारोप आणि कायदेशीर लढायांची शक्यता कमी होईल, अशी आशा आहे. आधीच न्यायालयांवर प्रकरणांचा मोठा भार आहे. यांच्या मनोमीलनामुळे न्यायालयांवरील भार कमी होईल. वकिलांचे मात्र नुकसान होईल.

नेत्यांच्या भांडणात निष्ठावंत छातीचा कोट करून उभे होते. आता नेत्यांनीच हातमिळवणी केल्याने आपण गंडविले गेल्याची जाणीव त्यांना झाली आहे. आता ज्यांच्या विरोधात गरळ ओकली, त्यांना विजयादशमीचा संदेश पाठवून त्यांच्याकडून येणाऱ्या उत्तराची वाट पाहावी लागणार आहे.

काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. मात्र, एकादशीला हातमिळवणी आणि नवरात्रीत पुनर्मिलन करून दोन्ही नेत्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. त्यामुळे काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा आरोप पुसला जाईल.

Vijay Wadettiwar, Pratibha Dhanorkar
Abhijeet Dipke emotional post : मी फक्त दोघांच्या ऑर्डर फॉलो करायचो, बाहेर वाटत असेल मी लीडर, पण..! अभिजीत दिपकेंची पहिल्यांदाच भावनिक पोस्ट

या दोन नेत्यांच्या संघर्षातून बऱ्यापैकी रोजगारनिर्मिती झाली होती. गाड्या पुरविणे, गाड्या अडविणे, नगरसेवक पळविणे सुरक्षा देणे आदी कामे कार्यकर्त्यांच्या हाताला लागली होती. यामुळेच दोन्ही गटांतील काही लोकांचे अस्तित्व टिकून होते. आता रोजगार गेला आणि अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात कमी पावसामुळे शेतकरी संकटात आहेत. सरकारने मदत जाहीर केली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमधील संघर्षामुळे ‘भाव’ वाढलेल्या नगरसेवकांसमोर आता वेगळाच दुष्काळ उभा राहण्याची शक्यता आहे. दोन गटांत विभागणी असली की प्रत्येक नगरसेवकाची ‘किंमत’ वाढते. मात्र, आता पुढील संघर्ष होईपर्यंत नगरसेवकांचा भाव घसरलेला असेल.

राज्य सरकार पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करत असताना, दोन्ही गटांतील नगरसेवकांच्या पर्यटनाला चांगलीच चालना मिळाली होती. आता नेतेच एकत्र आल्याने पुढील राजकीय पर्यटनाची गरज कमी होऊ शकते. त्यामुळे पर्यटन विभाग या मनोमिलनाकडे संभाव्य आर्थिक नुकसानीच्या दृष्टीने पाहत आहे.

नेत्यांना एकमेकांना भेटण्यासाठी परवानगीची गरज नव्हती. मात्र, दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना कोणाशी बोलावे आणि कोणापासून अंतर ठेवावे, याचे राजकीय गणित सांभाळावे लागत होते. आता नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनाही मोकळा श्वास घेता येईल. किमान भेटताना आजूबाजूला कोण पाहत आहे, याची चिंता तरी कमी होईल.

Vijay Wadettiwar, Pratibha Dhanorkar
Shivsena-NCP Clash : महायुतीत ठिणगी! रायगडात राडा; शिंदेंची शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांपासून अंतर राखताना विरोधी पक्षांतील नेत्यांशी संपर्क ठेवला होता. आता मनोमिलनानंतर हे संपर्क कमी होणार की राजकारणातील मैत्रीचे स्वतंत्र पर्व सुरूच राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण, राजकारणात शत्रूचा शत्रू मित्र असतो; पण मित्राचा मित्र नेहमीच मित्र असतो, असे नाही.

कालपर्यंत एकमेकांवर टीका करणाऱ्या नेत्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर उतरलेल्या कार्यकर्त्यांनी आता काय करायचे? जुन्या पोस्ट पुसायच्या, नव्या पोस्ट टाकायच्या की दोन्ही नेत्यांच्या जुन्या विधानांकडे दुर्लक्ष करायचे? यावर चिंतन करावे लागेल. दोन्ही गटांच्या समर्थकांना सध्या सोशल मीडियावर थोडी विश्रांती मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com