श्री क्षेत्र नारायणगड व भगवान भक्तीगडावर आज शनिवारी होत असलेल्या दसरा मेळाव्यांना मोठी गर्दी होणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजनही तगडे केले आहे. जिल्हा पोलिस दलासह छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी कुमक मागविण्यात आली आहे. रात्रीपासूनच बंदोबस्त श्री क्षेत्र नारायणगड व भगवान भक्तीगडावर पोचला आहे. दोन्ही मेळाव्यांसाठी तब्बल 1,862 अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील.
शनिवारी श्री क्षेत्र नारायणगडावरील दसरा मेळाव्याला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील व गडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांची उपस्थिती असेल. तर, भगवान भक्ती गडावर आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतीत होणाऱ्या दसरा मेळाव्याला यंदा पालकमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) देखील येणार आहेत. दोन्ही मेळाव्यांना मोठी गर्दी होणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर येथून राजकीय दिशा ठरण्याची शक्यता आहे.
नारायणगडावर तर पुर्वसंध्येपासूनच वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली आहे. गडावर मोठी गर्दीही जमली आहे. नारायणगडावरील मेळाव्याला गडाचे महंत शिवाजी महाराज व मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) हेलिकॉप्टरने येणार आहेत. तसेच, भगवान भक्तीगडावरील मेळाव्याला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व सुजय विखे हे तिघेही स्वतंत्र हेलिकॉप्टरने येणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांमुळे कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या दौंड येथूनही बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
दोन अपर पोलिस अधीक्षक, पाच पोलिस उपअधीक्षक, 15 पोलिस निरीक्षक, 60 सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, 700 पोलिस अंमलदार, 100 महीला पोलिस अंमलदार, वाहतूक शाखेचे 100 पोलिस अंमलदार, 300 होमगार्ड, महामार्ग सुरक्षा पथकाचे दोन अधिकारी व 50 पोलिस अंमलदार, नऊ दंगा काबू पथक (प्रत्येक पथकात 30 कर्मचारी), तसेच राज्य राखीव पोलिस बल, दौंड येथील दोन तुकड्या (प्रत्येकी 120 कर्मचारी) बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
दोन्ही दसरा मेळाव्यांच्या ठिकाणी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, जे वाहन धारक विनाकारण पार्किंग व्यतिरीक्त इतर ठिकाणी वाहने लावून रहदारीस अडथळा निर्माण करतील, अशी वाहने टोईंग करुन त्या वाहन धारकांवर कारवाया करण्यात येणार आहेत. तसेच, दसरा मेळाव्या ठिकाणी मद्य अथवा इतर गुंगीकारक पदार्थाचे सेवन करतांना कोणी मिळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तर दसरा मेळाव्याच्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण, घोषणा, बॅनरबाजी करुन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.