Dharashiva News : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याकडून दिवाळीसाठी वाटप करण्यात आलेली साखर रस्त्यावर ओतून तिची होळी करण्यात आली. ‘आम्हाला साखर नको; आरक्षण द्या,’ अशी मागणी सावंत यांच्या भूम-परांडा या मतदारसंघातील सावरगाव येथील मराठा समाजाने केली. (Maratha Reservation : Holi was done in Bhoom-Paranda with sugar obtained from Tanaji Sawant's factory)
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या चर्चेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले आहेत. त्यांच्या काही विधानाचा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनीही समाचार घेतला आहे. त्यातूनच साखरेची होळी करण्याची प्रतिक्रिया उमटली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात असणाऱ्या सावरगाव येथील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दिवाळीच्या सणानिमित्त राज्यातील साखर कारखान्यांकडून सभासद शेतकऱ्यांना साखरेचे वाटप करण्यात येते. त्यानुसार सावंत यांच्या भैरवनाथ शुगर या कारखान्याकडूनही मतदारसंघात साखरेचे वाटप करण्यात आले आहे.
सावंत यांच्या मतदारसंघातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आक्रमक झाला आहे. मतदारसंघात वाटप करण्यात आलेल्या साखरेची भूम-परांड येथील मराठा समाजाकडून होळी करण्यात आली आहे. ‘साखर नको, आरक्षण द्या, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देऊन मंत्री सावंतांचा या वेळी निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आताच आंदोलने कशी सुरू झाली, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मनोज जरांगे पाटील यांनी सावंतांना पैशाची मस्ती आहे. त्यांनी आमच्याकडे पैशाची मस्ती दाखवू नये’, असे उत्तर दिले होते. आरक्षण आणि आंदोलनाच्या वेळेवरून सावंत आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. कदाचित त्याची रिॲक्शन मतदारसंघातील मराठा समाजाकडून सावंतांच्या कारखान्याकडून मिळालेली साखर रस्त्यावर ओतून तिची होळी करण्यामध्ये झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.