MLC Election : संजना जाधवही शेवटच्या क्षणी माघारी फिरल्या : अब्दुल सत्तार सोडून सगळे शिवसेना आमदार सतीश चव्हाणांच्या पाठीशी

MLC Election : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संजना जाधव यांनी सतीश चव्हाण यांच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील मतभेद चर्चेत आले आहेत.
Marathwada Graduate Constituency election
Marathwada Graduate Constituency electionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Constituency : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली तेव्हा महायुती व महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा केली. परंतु उमेदवारी अर्ज भरेपर्यंत युती-आघाडी बंडखोरी, छुपा पाठिंबा तर काही ठिकाणी उघडपणे बंडाला बळ देण्याचे प्रकार घडले. याचा परिणाम महाविकास आघाडीतील बिघाडी आणि महायुतीत मीठाचा खडा पडण्यात झाला. मात्र जसजसा प्रचार पुढे जाऊ लागला तसा त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी बंडोबांना शांत करत परिस्थिती अधिक चिघळणार नाही याची काळजी घेतली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातही युती-आघाडीत मतभेद पहायला मिळाले. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील हे मैदानात आहेत. महायुतीचे एकमेव सतीश चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. पण त्यांच्याविरोधात मित्रपक्ष शिवसेनेने असहकाराचे हत्यार उपसले होते. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह मराठवाड्यातील शिवसेना आमदारांनी चव्हाण यांच्या प्रचारापासून लांब राहण्याचे धोरण स्वीकारले होते. यातही संजना जाधव आणि अब्दुल सत्तार यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिला होता.

शिवसेनेचे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनाही भरीस पाडले होते. सत्तार यांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत संपर्क कार्यालयातच शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत त्यांना पाठिंबा जाहीर केला. तर कन्नडमध्ये संजना जाधव यांच्या संपर्क कार्यालयात जाऊनही प्रताप पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. यामुळे आमदार संजना जाधव यांच्या भूमिकेबद्दलही संशयाचे जाळे निर्माण झाले होते.

Marathwada Graduate Constituency election
Satish Chavan: सतीश चव्हाणांच्या चौथ्या विजयाचा अमरसिंह पंडितांना विश्वास; म्हणाले, ‘मी त्यांच्या कामाचा साक्षीदार’

पण कोअर कमिटीच्या बैठकीत नेत्यांनी राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून यातून मार्ग काढला. अमरावतीमधील शिवसेनेच्या उमेदवाराविरोधातील बंडखोरांना शांत करण्यात आले. त्यानंतर शिरसाट यांनी त्यांची तलवार म्यान केली. सतीश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना तन-मन-धनाने काम करणार असल्याची ग्वाही शिरसाठ यांनी चव्हाण यांच्या घरी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

Marathwada Graduate Constituency election
Satish Chavan: काय केलं 18 वर्षात? विचारणाऱ्या विरोधकांना सतीश चव्हाण यांचे उत्तर; कार्यपूर्ती अहवालातून मांडला लेखाजोखा

पाठोपाठ संजना जाधव यांनीही कन्नडमध्ये सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या पदवीधरांच्या संवाद मेळाव्यात हजेरी लावली. चव्हाण यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित केली. महायुतीची एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद आणि पदवीधर मतदारांचा विश्वास यांच्या बळावर विजयाचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यामुळे मराठवाड्यात अब्दुल सत्तार वगळता शिवसेनेचे सर्व आमदार हे महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्याच पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com