

Marathwada Graduate Constituency News: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचाराला वेग आला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील दोन्ही उमेदवार नवखे, तर दुसरीकडे तीन टर्म या मतदारसंघावर आपली मजबूत पकड राखून असलेले आमदार सतीश चव्हाण यांच्यात लढत होत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला महायुतीचे उमेदवार असलेले सतीश चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.
अठरा वर्षात काय केले? असा सवाल करत विरोधकांनी महायुतीच्या सतीश चव्हाण यांना खिंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु विरोधकांच्या हल्ल्याला त्यांनी आपल्या अठरा वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा कार्यपूर्ती अहवाल प्रसिद्ध करत चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून विजयी झालेल्या सतीश चव्हाण यांनी सलग तीन वेळा बाजी मारली आहे.
विजयाची हॅट्रीक हीच आपल्या कामाची पावती असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो आहे. मात्र विरोधकांना त्यांचा हा दावा मान्य करत नसल्याने अठरा वर्षांचा हिशेब द्या, असे आव्हान ते देताना दिसत आहेत. महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतानाच चव्हाण यांनी आपल्या अठरा वर्षातील कामगिरीचा हिशेब कार्यपुर्ती अहवालाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवला. आता तो विरोधकांच्या किती पचनी पडतो? हा खरा प्रश्न आहे.
अठरा वर्षातील कामांची जंत्री मांडताना सतीश चव्हाण यांनी प्रामुख्याने एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी शासनस्तरावर केली. विधान परिषदेत प्रश्न आणि त्यांचा पाठपुरावा याचा परिणाम म्हणून २५ एप्रिल २०१६ रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ वर्ष तर मागसवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्ष करण्याचा निर्णय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या शिवाय कायम विविध पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या. त्यात होणाऱ्या गैरप्रकारांमुळे ते बंद करण्याची मागणी सातत्याने सभागृहात लावून धरली. त्यालाही यश मिळाले आणि हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्यास भाग पाडल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
दुष्काळी मराठवाड्यात विद्यार्थ्यांना दिलासा
सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करून घेण्यासाठी चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधरचे आमदार म्हणून सरकारकडे पाठपुरावा केला. यंदा मराठवाड्यात कोरडा दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर १९ सप्टेंबर २०२६ रोजी चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे अशी मागणी केली होती. २५ रोजी या संदर्भातील आदेश निर्गमित झाले आहेत. हे आपले यश असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.
विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्रांसाठीचा दंड माफ करून घेणे, पोलीस उपनिरीक्षक पदाची वयोमर्यादा वाढवणे, मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात, कोटा येथे लाॅकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी घेतलेला पुढाकार, सारथी वसतिगृह सुरू करण्यासाठी केलेला पाठपुरावा, कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासाठी सभागृहात उठवलेला आवाज हे आपले काम आहे, असे चव्हाण यांनी आपल्या कार्यपुर्ती अहवालात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.