Jayakwadi Dam News : जायकवाडी धरणातील पाणी कपातीची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली आहे. या विरोधात मराठवाड्यातील वातावरण तापू लागले आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणाला हरताळ फासणारा हा निर्णय असून मराठवाड्यातील पाण्याची तहान भागली का? आमचा दुष्काळ संपला का? असा संतप्त सवाल करत मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, उद्योजक आक्रमक झाले आहेत.
आज मराठवाडा बचाव समितीच्यावतीने गोदावरी (Marathwada) मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयात पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. जायकवाडी धरणातील पाणी कपाती अहवालाचा फेरविचार करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापुर्वीच करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या मिळणार्या पाण्यात सात टक्के कपात करणारी बाब मराठवाड्यातील लाखो जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.
पाणी (Water issue) कपातीची शिफार करताना 'मेरी'संस्थेला मराठवाड्याच्या गरजेचा विचार करावासा वाटला नाही का?, मराठवाड्यात या दहा वर्षात नवीन जलस्त्रोत निर्माण झाले का?, मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा संपला आहे का?, मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची आणि उद्योगांसाठी लागणार्या पाण्याची मागणी नाही का?, मराठवाडा महाराष्ट्रात नाही का?, नेमके काय घडले की ज्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचे 7 टक्के पाणी ‘मेरी’ला नगर-नाशिकसाठी अधिकचे आरक्षित करावे वाटले, अशा प्रश्नांचा भडिमार या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केला.
मराठवाड्यात रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतीस सिंचनासाठी पाण्याचा अभाव हे याचे प्रमुख कारण आहे. अशावेळी ऊर्ध्व भागातील जलस्त्रोतांचे अधिकचे वापरातील पाणी मराठवाड्यात सोडून या भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्या ऐवजी आमच्या हक्काचे पाणी अडविण्याचा घाट शासकीय संस्था राजकीय दबावापोटी घालत असतील तर ते राज्याच्या समतोल विकासासाठी मारक आहे, याकडे या परिषदेत लक्ष वेधण्यात आले.
एकीकडे मराठवाड्यातील पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी राज्य सरकारने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे मराठवाड्याला देण्याची योजना आखली असताना दुसरीकडे 'मेरी'संस्थेने मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्याचे हक्काचे पाणी पळवण्याचा घातलेला घाट अन्यायकारक आहे.समन्यायी पाणी वाटपाच्या सूत्रास हरताळ फासणारा असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाईल, असे अतुल सावे यांनी बैठकीत आश्वस्त केले.
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार कैलास पाटील, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक श्री.सं.रा.तिरमनवार, मराठवाडा बचाव समितीचे समन्वयक प्रा.चंद्रकांत भराड, सुरेश वाकडे आदींची या बैठकीला उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.