परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी ‘स्वबळावर लढणार’ अशी घोषणा केली.
या वक्तव्यानंतर महायुतीतील सहयोगी पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला असून, मराठवाड्यात राजकीय समीकरणे बदलू शकतात.
बोर्डीकरांच्या स्वबळाच्या घोषणेमुळे भाजपचे स्वतंत्र धोरण पुढे येत असून, महायुतीतील एकजूट प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
Shivsena BJP : मराठवाड्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असे निश्चित समजले जात आहे. सिल्लोड- सोयगाव आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, संतोष बांगर यांनी परस्पर स्वबळाची घोषणा केल्यामुळे महायुतीला तडा गेल्याची चर्चा आहे. दरम्यान परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेत भाजपही परभणी जिल्ह्यात स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करून टाकले.
तिकडे जालन्यात शिवसेनेचे (Shivsena) नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर पाटील दानवे यांना दिलेला युतीचा प्रस्ताव त्यांनी वेटिंगवर ठेवला आहे. एकूणच मराठवाड्यात महायुतीचे बारा वाजण्यास सुरुवात झाल्याची ही चिन्ह असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत बहुतांश भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्याला दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे समर्थन दिले नसले तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्या. जिथे मित्रपक्षाचे तगडे उमेदवार असतील तिथे मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एकूणच राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा मूड हा स्वबळाचा दिसतो. मराठवाड्यातील नेत्यांना तसा संदेश देण्यात आल्यामुळे भाजपचे (BJP) मंत्री, आमदार स्वबळाची भाषा करू लागले आहेत. परभणी जिल्ह्यात काँग्रेसचे बडे नेते माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने आधीच मजबूत असलेली भाजपा अधिक भक्कम झाल्याचा दावा केला जात आहे.
जिल्ह्याला पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री मिळाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी याचे श्रेय एकट्या भाजपला घ्यायचे आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवून शतप्रतिशत भाजपा आणण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. परभणीत मेघना बोर्डीकर यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना याच पॅकेजचा उल्लेख करत प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची इच्छा स्वबळावर लढण्याची असल्याचे सांगत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी नुकताच केला. प्राथमिक चर्चा झाली असून चर्चेची दुसरी फेरी झाल्यानंतर निर्णय जाहीर करू असे मुंडे यांनी एकतर्फी सांगून टाकले. पंकजा मुंडे मात्र या संदर्भात अद्याप काहीच बोलल्या नाहीत. त्यामुळे बीडमध्ये भाजप युती करून लढतो की मग स्वबळावर? हे काही दिवसातच स्पष्ट होईल. शिवसेनेची युतीमध्ये लढण्याची इच्छा असताना त्यांच्या प्रस्तावाकडे मात्र भाजपचे नेते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
युती करा हो..
जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी नमते घेत काही जागा आमच्या पेक्षा जास्त घ्या, पण युतीत लढा असं आवाहन भाजपच्या नेत्यांना केले होते. इकडे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीही भाजपच्या नेत्यांना एकत्रित लढण्यासाठी गळ घातली आहे. मात्र भाजपकडून मित्रपक्षाच्या या प्रस्तावाला अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेले नाही. त्यातच काल अर्जुन खोतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला 20 ऑक्टोबर पर्यंत युतीसाठी वाट पहा, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे आदेश दिल्याचे माध्यमांसमोर सांगितले.
तर भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर पाटील दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या युतीच्या प्रस्तावावर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांना कळवू, अशी ताठर भूमिका घेतली आहे. युतीमधील या दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तूर्तास दोस्ती नको, निवडणूक झाल्यानंतर सत्तेसाठी एकत्र येऊ, असे धोरण आखल्याचे दिसते. मराठवाड्यात महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तडा जाणार, अशी चर्चा आणि एकूणच परिस्थिती दिसते आहे.
1. मेघना बोर्डीकर यांनी कोणते वक्तव्य केले?
त्यांनी परभणी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.
2. या वक्तव्यामुळे काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये मतभेद वाढू शकतात आणि युतीची एकता धोक्यात येऊ शकते.
3. मेघना बोर्डीकर सध्या कोणत्या पदावर आहेत?
त्या महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत.
4. महायुतीमध्ये कोणते प्रमुख पक्ष आहेत?
भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट हे महायुतीचे घटक आहेत.
5. ही घोषणा मराठवाड्याच्या राजकारणावर कशी परिणाम करेल?
मराठवाड्यात भाजपचे स्वतंत्र अस्तित्व आणि संघटनात्मक बळ वाढवण्यास ही घोषणा महत्त्वाची ठरू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.