BJP-Shivsena News : भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. गावचे सरपंच ते दोन वेळा आमदार, पाच वेळा सलग जालन्याचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षाकडूनच दगाफटका झाल्याने दानवे यांच्या विजयाचा षटकार हुकला होता. आपल्या पराभवाला हातभार लावणाऱ्यांचा 'करेक्ट कार्यक्रम'आता त्यांनी सुरू केला आहे.
जालन्यात आमदार अर्जून खोतकर यांनी विधानसभा निवडणुकीआधी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर खोतकरांच्या विधानसभेचा मार्ग काहीसा मोकळा झाला. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मात्र अब्दुल सत्तार यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांनी वेगळी भूमिका घेतली. 'सिल्लोडचे पाकिस्तान होत आहे' हे विधान अन् मतदारसंघात सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी या दानवेंच्या खेळीने अब्दुल सत्तारांचा 'बिसमिल्ला'थोडक्यात हुकला.
आता रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांचा प्राण असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांना धक्का देण्याच्या तयारीला लागले आहेत. राजाचा जीव जसा पिंजऱ्यातल्या पोपटात होता, तसाच जीव अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा नगरपरिषेदेतील सत्तेत असल्याचे बोलले जाते. या सत्तेच्या जोरावरच अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या तीस वर्षाच्या राजकारणात चार वेळा मंत्री पद, आमदारकी, जिल्हा बॅंक, दूध संघ अन् सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता कायम राखली.
आता याच सत्तार यांच्या नगरपरिषदेतील सत्तेच्या पोपटाची मान मोडण्याची रणनिती रावसाहेब दानवे आणि स्थानिक भाजपचे पदाधिकारी आखताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात भाजपमधून उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत गेलेल्या सुरेश बनकर यांनी अब्दुल सत्तारांच्या तोंडचा घास हिरावलाच होता. पण अवघ्या 2420 मतांनी सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम हुकला. त्यामुळे सत्तारांनी विजयाचा चौकार लगावला असला तरी त्यांना घटलेल्या मताधिक्याचा मोठा धक्का बसला.
पराभव होता होता राहिला आणि दुसरीकडे राज्यात महायुतीची बहुमताने सत्ता येऊनही मंत्रीपद गेले. यामुळे सत्तार यांचे मानसिक खच्चीकरण झाले. पण मतदारसंघात ठाण मांडून त्यांनी पुन्हा गमावलेले जनमत जमवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे भाजपने सत्तार विरोधात मतदारसंघात असलेली विरोधाची धग कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये, याची काळजी घेणे सुरू केले आहे. सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी हा त्याचाच भाग म्हणावा लागेल.
रावसाहेब दानवे आक्रमक..
सिल्लोडचा पाकिस्तान होत असल्याचा उल्लेख केल्यामुळे टीकेचे धनी झालेले रावसाहेब दानवे यांनी पुन्हा या वादाला हवा दिली आहे. सिल्लोड शहरातील चौकांना असलेल्या नावांकडे लक्ष वेधत अब्दुल सत्तार मतदारसंघात कसे जातीयवादाचे राजकारण करतात? हे सांगण्याचा दानवे यांनी काल प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद त्यांनी मंत्री असताना केलेल्या भानगडीमुळे गेले, त्या मी खासगीत कधी तरी सांगेन असे म्हणत आपला सत्तार विरोध कायम असल्याचे दाखवून दिले.
निसटता पराभव आणि मंत्रीपद गमावल्याने अब्दुल सत्तार सध्या शांत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांच्या मुळावर शेवटचा घाव घालण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीतील माझा पराभव कोणत्या नेत्यामुळे नाही, तर जनतेमुळे झाला. मी याचे श्रेय किंवा दोष दुसऱ्या कोणाला देत नाही, असे सांगत दानवे सिल्लोडमध्ये मोठा डाव टाकत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.