सचिन पवार
Gangapur-Khultabad Constituency : समन्यायी पाणी वाटपासाठी लढा दिला अन् मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात यश आलं. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शेती, सिंचन, रस्ते, पाणी, आरोग्य अशा सगळ्या प्रश्नावर मी तीन टर्म काम करतोय. बरीच कामे झाली आहेत, काही प्रगती पथावर आहेत. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात यशस्वी झालो, तसेच आता मतदारसंघ सुजलाम सुफलाम करायचा आहे, असा निर्धार भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केला.
'सकाळ'च्या वतीने आयोजित 'माझा मतदारसंघ, माझी भूमिका' या उपक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार सहभागी झाले. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील विकासाची ब्लू प्रिंट मांडली. गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून आलेले आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर आपला अधिक भर असले असे सांगितले. तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीला वाढीव जागा, संपूर्ण मतदारसंघात पाणी, मुलांना दर्जेदार शिक्षण आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास साधायचा असल्याचे बंब म्हणाले.
मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर प्रश्न होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यावर ठाम भूमिका मांडण्याचा निर्णय मी घेतला. त्या दृष्टीने चाललो आणि त्यात मला यशही मिळाले. (BJP) कारण समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार पाण्यावर प्रत्येकाचा सारखा अधिकार आहे. हे धोरण समोर ठेवून लढा दिला. त्यात काही अडचणी आल्या. आता मागील नऊ वर्षांपासून मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत आहे.
मुलांना, विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत चांगले शिक्षण मिळाले तरच त्यांचे भवितव्य चांगले घडेल, हे लक्षात आले. परंतु, प्रत्यक्षात 80 टक्के शिक्षक केवळ पगार घेतात, त्या तुलनेत ते मुलांना शिक्षण देत नसल्याचे समोर आले. हे चित्र कुठेतरी बदलायला हवे म्हणून या प्रश्नाला मी हात घातला. यामुळे काहीकाळ टीकेचा धनी व्हायला लागले. परंतु, मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करते. मग त्यांना चांगले शिक्षण मिळायलाच हवे. परफॉर्मन्स बेसवर शिक्षकांना वेतन दिले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. यात मुलांना चांगले शिक्षण मिळावे हाच हेतू असल्याने मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असेही बंब यांनी स्पष्ट केले.
माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे आहेत. त्याच्या विकासासाठीही कायम प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी साडेसहाशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदारसंघात जागतिक स्तरावरील वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, भद्रा मारुती मंदिर, म्हैसमाळ अशा विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा समावेश आहे. यात वेरूळ, खुलताबाद, म्हैसमाळ या ठिकाणांचा सामावेश आहे. येथे उपजीविका चालवणाऱ्यांसाठी दुकाने देऊन सर्व विकासकामे केली जाणार असल्याचे बंब म्हणाले. यासह पुढील दीड वर्षात येथे अंतर्गत रस्ते, फ्लॉवर गार्डन अशी अनेक कामे करण्यासाठी संकल्प केले आहेत.
करोडीत क्रीडा विद्यापीठ
मतदारसंघातील करोडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापनेची मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. परंतु, त्या दृष्टीने संपूर्ण काम सुरू आहे. येत्या काही वर्षांतच करोडी येथे क्रीडा विद्यापीठ उभारले जाणार आहे. यामुळे केवळ मतदारसंघ नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याला नाव मिळणार आहे. माझ्या मतदारसंघात पाणी मिळावे या दृष्टीने सध्या लखमापूर ते सुलतानाबाद अशी वीस हजार एकर असणारी योजना सुरू आहे. बंद पाइपलाइनमधील ही योजना आहे. विशेष म्हणजे पाणी मतदारसंघातील सर्वच गावांपर्यंत पोचावे, त्यासाठी नियोजन केले जात असून, खुलताबादपर्यंत पाणी कसे पोचेल त्यासाठी प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
शिक्षकांच्या पगारावर 80 हजार कोटी खर्च
राज्य शासनाचा सर्वात अधिक खर्च शिक्षण आणि शिक्षकांवर होतो. यंदाच्या आर्थिक वर्षात दोन लाख कोटी वेतन आणि अन्य बाबींवर खर्च होणार आहे. यात तब्बल 80 हजार कोटी खर्च हा शिक्षकांवर होतो. उर्वरित खर्च इतर 27 खात्यांवर होतो. खर्चाची तुलना पाहिली तर विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. परंतु, प्रत्यक्षात तसे होत नाही. 80 टक्के शिक्षक हे एलआयसी, बँकेचे एजंट म्हणून काम करतात. प्लॉटिंग, रस्त्याचे कंत्राट घेतात. यामुळे शिक्षकांना डोंगरावर झाडे लावण्यासाठी पाठवायला हवे किंवा परफॉर्मन्सवर वेतन द्यायला हवे, असा टोला बंब यांनी लगावला. खोट्या प्रमाणपत्राद्वारे काही लोकांनी नोकरी मिळवली आहे. प्रकरणात चौकशी व्हावी, अशी अपेक्षाही बंब यांनी व्यक्त केली. जर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण नीट मिळाले नाही तर ती अख्खी पिढी उद्ध्वस्त होईल, यामुळे मी या विरोधात आवाज उठवला.
अल्पवयीन मुलींसाठी बालगृहाची व्यवस्था आहे. त्यामुळे त्या तिथे राहू शकतात. परंतु, अठरा वर्षांवरील मुली कुठे राहणार, असा प्रश्न आहे. त्यासाठी अनुरक्षकगृह आहेत. परंतु, ती दुसऱ्या शहरात आहेत. आपल्या येथेही असे अनुरक्षकगृह व्हावे यासाठी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरवठा केला. दुसरे म्हणजे अशा मुलींचा शोध घेऊन त्यांना तिकडे न्यावे, असाही प्रस्ताव आहे. नाशिकला कुंभमेळ्यासाठी लाखोंच्या संख्येत भाविक येतात. त्यामुळे नाशिकला मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो. परंतु, कुंभमेळ्यासाठी आलेले हे भाविक माझ्या मतदारसंघातील वेरूळ, खुलताबादलाही येतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर काही निधी इकडेही मिळावा आणि त्यातून काही कामे करता यावी यासाठी प्रयत्न आहे.
वेरूळ येथील ऐतिहासिक स्थळांना वर्ल्ड हेरिटेज स्टेटस असा युनेस्कोचा दर्जा आहे.हा दर्जा काढला जाणार असल्याची चर्चा आहे. हा दर्जा आम्ही अजिबात काढू देणार नाही. त्या ठिकाणी सोयी-सुविधाही उपलब्ध करून देत असल्याने असे होणार नसल्याचे बंब यांनी ठामपणे सांगितले. आपल्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक येथे थांबलेच पाहिजे ही माझी भूमिका आहे. परंतु, त्या दृष्टीने नागरिकांनी ही जागरूक असणे आवश्यक आहे. काही गोष्टी त्यांनीही समजून घ्याव्यात आणि आपली जबाबदारी पार पाडावी. जर हे सर्व लोक त्यांच्या ड्यूटीच्या ठिकाणी थांबले तर तेथील बाजारपेठ, अर्थव्यवस्थेला बळ मिळेल.
नवीन एमआयडीसी उभारणार
मतदारसंघातील नवीन दोन हजार एकर जागा मिळवण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यासह 20 टक्के ही इंडस्ट्री महिलांसाठी असावी, येथे कर्मचाऱ्यांपासून ते मालक अशा सर्वच महिला असाव्यात, अशी माझी संकल्पना आहे आणि त्यादृष्टीने मी प्रयत्न करत असल्याचे प्रशांत बंब यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.