Jalna News : भोकरदन तालुक्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले कैलास बोराडे यांची आमदार संतोष दानवे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या संपूर्ण प्रकरणात बोराडे कुटुंबियांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. दोषींवर कडक कारवाईसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे संतोष दानवे यांनी या भेटीत सांगितले. कैलास बोराडे यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी उपचार करणाऱ्या डाॅक्टरांशीही चर्चा केली.
कैलास बोराडे यांना भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथे महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले असताना जुन्या वादातून मारहाण करण्यात आली. (Jalna) आधी बाचाबाची आणि त्यानंतर यांचे रुपांतर हल्ल्यात झाले. मंदिरा जवळ असलेल्या एका पेटत्या चुलीत लोखंडी रॉड टाकून आरोपींनी कैलास बोराडे यांना चटके दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.
या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावाविरोधात पारध पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या प्रकरणावरुन वादंग निर्माण झाले. (Shivsena) आरोपींनी अमानूषपणे कैलास बोराडे यांना मारहाण करत चटके दिल्याने आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी करण्यात आली.
दरम्यान, मतदारसंघातील या गंभीर घटनेनंतरही आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांनी कैलास बोराडे यांची भेट का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.8) संतोष दानवे यांनी कैलास बोराडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने भविष्यात कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणीत बोराडे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देतानाच दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संतोष दानवे यांनी यावेळी सांगितले. गुन्हेगारांना कुठल्याही परिस्थितीत शासन होणारच, असा विश्वासही त्यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या जानेफळ गायकवाड गावात काही दिवसांपूर्वी जुन्या वादातून एका व्यक्तीस अमानुष मारहाण करून त्याला लोखंडी सळईने चटके दिल्याचा प्रकार समोर आला होता. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौड यांच्या भावाला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरूनच कैलास बोराडे यांना मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. तर आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, केवळ राजकीय हेतूने विरोधक मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नवनाथ दौड यांनी स्पष्ट केले.
घटना घडली तेव्हा आपण कुटुंबासह प्रयागराजला गेलो होतो, असे सांगत दौड यांनी तेथील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला होता. दौड यांचा भाऊ भागवत दौड याला पोलीसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. जुन्या वादातून आरोपीने ही मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे. बोराडे हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्याची आरोपी सोबत बाचाबाची झाली. त्यानंतर जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून आरोपींने बाराडे यास हात, पाय, कमरेला चटके दिले.
या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावा विरोधात पारध पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत आवाज उठवला. या प्रकरणाला जातीय रंग दिला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.