Marathwada Politics : राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार नेत्यांच्या मनात फारसा येत नाही. आजही राजकारणात वयाची 80 वर्ष पूर्ण केलेली मंडळी जोमाने काम करताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. अशी अनेक नावे डोळ्यासमोर येतात, परंतु काही नेते कधीकधी उद्विग्नतेतून निवृत्तीचे संकेत देतात.
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar), सिल्लोड-सोयगावचे चार टर्म आमदार आणि मंत्री राहिलेले अब्दुल सत्तार यांनी पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत समर्थकांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे लोणीकर, सत्तार हे दोघेही विधानसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा विधानसभा निवडणुकीत अवघ्या 2420 मतांनी विजय झाला. तर लोणीकर यांचा परतूरमधून साडेचार हजार मतांनी. दोघेही माजी मंत्री राहिलेले हे आमदार मतदारसंघावरील पकड ढिली झाल्यामुळे काठावर निवडून आल्याचे दिसून आले. लोणीकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ए.जी.बोराडे यांनी तर अब्दुल सत्तार यांना सुरेश बनकर यांनी जेरीस आणले होते. त्यामुळे असलेल्या नाराजीतून या दोन्ही नेत्यांनी आपल्याला पुढची विधानसभा लढवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर करून टाकले.
अब्दुल सत्तार यांनी विधानसभा लढवणार नाही? हे जाहीर केले असले तरी पुढे काय? ही भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. परंतु ज्या पद्धतीने ते पुन्हा मतदारसंघात सक्रीय झाले आहे, ते पाहता निवडणूक लढवणार नाही, हा त्यांचा जुमला ठरण्याची शक्यता अधिक आहे. तर दुसरीकडे आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या वाढदिवशीच आपण आता 60 वर्षांचे झालो आहोत, म्हणजे रिटायरमेंटला आलो असल्याचे सांगत विधानसभा निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले.
आठ वेळा विधानसभा निवडणूक लढलो चार वेळा निवडून आलो, एकदा मंत्री झालो कधी कोणाला पैसे वाटले नाही, की दारू पाजली नाही, असे अभिमानाने लोणीकर यांनी सांगितले. विधानसभा लढवणार नसलो तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली आणि साधु-संतांचे आशीर्वाद असले तर एकदा लोकसभा लढवण्याची इच्छाही लोणीकरांनी व्यक्त केली. आता वाढदिवशीच व्यक्त केलेली इच्छा भाजपचे वरिष्ठ नेते पूर्ण करतात? की मग त्यांच्या दुसऱ्या इच्छेप्रमाणे पुढील विधानसभा निवडणुकीत परतूरमध्ये नव्या चेहऱ्याला संधी देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रावसाहबे दानवे अजूनही मैदानात..
एकीकडे सत्तार-लोणीकरांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यातील भाजपचे बडे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही एक भूमिका घेतली आहे. विधानसभा, परिषद, राज्यसभेवर आपण जाणार नाही. पण पक्षाने संधी दिली तर 2029 मध्ये पुन्हा लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. गावचे सरपंच, पंचायत समितीचे सभापती, दोन वेळा आमदार, पाच वेळा सलग लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे खासदार, केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या दानवे यांच्या मनात मात्र निवृत्तीचा विचार अजिबात येत नाही. उलट पुढची लोकसभा लढवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.