Sandipan Bhumre News : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ठाकरे गटाला धक्के बसू लागले आहेत. महिला आघाडीच्या पदाधिकारी, काही माजी नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता खासदार संदीपान भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघातून संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवला आणि दीड वर्षापुर्वी हातातून गेलेली बिडकीनची ग्रामपंचायत सरपंच व पाच ग्रामपंचायत सदस्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश देत पुन्हा ताब्यात घेतली. बिडकीन गावाचा विकास करण्यासाठी आपण शिंदे गटात प्रवेश केल्याचे सरपंच अशोक धर्मे यांनी म्हटले आहे.
राज्यात शिवसेनेत Shivsena फूट पडल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तत्कालीन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना मतदारसंघातील सर्वात मोठ्या ग्रामंपचायत असलेल्या बिडकीनमध्ये पराभवाचे तोंड पहावे लागले होते. मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात ठेवत भुमरे यांनी आपले वर्चस्व सिध्द केले होते.
परंतु तालुक्यातील सगळ्यात मोठा ग्रामपंचायत असलेल्या बिडकीन मध्ये मात्र भुमरे यांच्या पॅनलचा उद्धव ठाकरेंच्या पॅनलने धुव्वा उडवला होता. तेव्हा बिडकीनमधील या विजयाची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात झाली होती. भुमरे यांच्यासाठी बिडकीनची ग्रामपंचायत हातातून जाणे मोठा धक्का होता. पण अवघ्या दीड वर्षात ही ग्रामपंचायत पु्न्हा शिंदे गटाकडे आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिडकीन सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर भुमरे यांनी पुन्हा वर्चस्व मिळवल्याने याचा फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतो. तर ठाकरे गटाला हा धक्का असणार आहे.
सरपंच अशोक भानुदास धर्मे यांनी पाच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत आज (रविवारी) खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील संपर्क कार्यालयात शिंदे गटात प्रवेश केला. नोव्हेबर 2022 मध्ये झालेल्या बिडकीन ग्रामपंचायत सरपंच पदासाठी डिसेंबर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अशोक धर्मे थेट जनतेतून निवडून आले होते.
तत्कालीन मंत्री संदीपान भुमरे Sandipan Bhumre यांच्या पॅनलच्या उमेदवाराचा धर्मे यांनी पराभव केला होता. पण खासदार होताच भुमरे यांनी सरपंच धर्मे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य किरण गुजर, सागर फरताळे, मोहन हिवाळे, ज्ञानेश्वर कांबळे, रमेश शिंदे यांनी आज ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. भुमरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. बिडकीन गावाचा विकास व्हावा यासाठी मी सदैव तत्पर राहणार, असल्याचे सरपंच अशोक धर्मे यांनी म्हटले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.