

Nanded Politics: नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने सर्व पक्षीय नेत्यांची कालपर्यंत एकजूट दिसली. 23 पैकी 11 जागा बिनविरोध काढल्यानंतर आज माघारीच्या शेवटच्या दिवशी 12 जागाही बिनविरोध काढून अख्खे संचालक मंडळच बिनविरोध निवडले जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. गेल्या आठवडाभरापासून खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्ह्यातील इतर नेते बैठकांवर बैठका घेऊन खलबंत करत होते. अशोक चव्हाण यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधल्याचे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात माघारीच्या दिवशी हे सगळे फोल ठरले.
बँकेचे माजी अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या सुनबाई मीनल खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतः आणि कन्या प्रणिता देवरे यांना बिनविरोध संचालक करण्यात यश मिळवले. परंतू संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध करण्याच्या अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना मात्र सुरूंग लागला. आता हा सुरूंग नेमका कोणी लावला? यावर खल सुरू झाला आहे. अकरा संचालक बिनविरोध आल्यानंतर आता उर्वरित बारा जागांसाठी निवडणूक होणार आहे.
भाजपाचे आमदार भीमराव केराम, नायगावचे राजेश पवार यांच्या पत्नी पूनम पवार, आमदार तुषार राठोड यांनीही आपल्या जागा बिनविरोध आरक्षित केल्या. नेते मंडळी व त्यांचे सगेसोयरे बिनविरोध संचालक झाल्यानंतर 12 जागांसाठी इतराना मात्र झगडावे लागणार आहे. बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये कंधार-प्रणिता देवरे चिखलीकर, लोहा - आ. प्रताप पाटील चिखलीकर, नायगाव - श्रीनिवास चव्हाण, मुखेड आमदार तुषार राठोड, किनवट -आमदार भिमराव केराम, उमरी - मारोतराव कवळे, बिलोली - मिनल पाटील खतगावकर यांचा समावेश आहे.
तर महिला मतदारसंघामधून सुशिला हणमंतराव बेटमोगरेकर, पूनम राजेश पवार यांच्यासह इतरमधून शिवराम लूटे, कैलास देशमुख गोरठेकर यांची बिनविरोध संचालक मंडळावर वर्णी लागली आहे. 23 पैकी 11 संचालक बिनविरोध तर 12 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने दिग्गज नेत्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे केलेले दावे सपशेल खोटे ठरले आहेत.
नवीन सहकार कायद्यानुसार दहा वर्षे संचालक असलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी होती. तरीही प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज लोहा येथून दाखल केला होता. अर्ज छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो बाद केला होता. याविरोधात चिखलीकर यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले होते. नव्या सहकार कायद्यानूसार दहा वर्ष पूर्ण झालेल्या संचालकांना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवण्याबाबतच्या निर्णयाची अद्याप अधिसूचना निघालेली नाही. या सबबीवर चिखलीकर यांचा अर्ज कायम ठेवला गेला. लोहामधून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर हे बिनविरोध संचालक झाले.
विमुक्त जाती भटक्या जमाती
ज्ञानेश्वर दहिफळे, उकंडराव जाधव
ओबीसी
अनिल पाटील बाभळीकर, ज्ञानेश्वर राजेगोरे
एसी एसटी
रामचंद्र मुसळे, विजय सोनवणे, प्रतिभा एर्डावार
हदगाव
चंद्रशेखर कदम, कृष्णा पाटील आष्टीकर
हिमायतनगर
माधवराव पाटील जवळगावकर, विशाल राठोड
देगलूर
विजयसिंह देशमुख, श्वेता पाटील
धर्माबाद
दत्तात्रय रेड्डी, गोविंद जाधव
नांदेड
अतुल वाघ, संगिता पाटील डक
भोकर
राजू जाधव, माधव कदम
माहूर
राजेंद्र केशवे, ज्योतीबा खराटे
मुदखेड
मारोती जाधव, मारोतराव पाटील
अर्धापूर
बालाजी कदम, ज्ञानेश्वर राजेगोरे
हे मैदानात कायम असून 12 जागांसाठी 26 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत थेट सामना रंगणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवच्या दिवशी 179 पैकी 142 उमेदवारांनी माघार घेतली. नांदेड जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी अशोक चव्हाण, अमरनाथ राजूकर यांच्यासह अनेक नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र, निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या इच्छुकांसमोर त्यांना अखेर माघार घ्यावी लागली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.