Nanded Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाणे काँग्रेसमधील त्यांच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांना पटलेले नाही. त्यामुळे अजूनही अशोक चव्हाण यांचे जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपचे स्वप्न अपूर्ण आहे. शिवाय चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपमध्येही दोन गट तयार होऊन खदखद वाढली आहे.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील ही खदखद कधीही बाहेर उफाळून येऊ शकते, पण त्यांच्यासमोर सक्षम पर्याय नाही. शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीचा प्रकाश आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी तुतारी वाजवली, तर नांदेडमध्ये वेगळे चित्र निर्माण होऊ शकते.
परंतु पक्षफुटीनंतर या दोन्ही नेत्यांनी आधी आपापले गड सांभाळण्यावरच अधिक लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या मराठवाड्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अशोक चव्हाण(Ashok Chavhan) यांच्यासारखा मातब्बर नेता काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर खरंतर ठाकरे-पवारांनी नांदेडवर फोकस करायला हवा होता. परंतु इथे शिल्लक काँग्रेसचा कसाबसा गट चव्हाण आणि भाजपला विरोध करताना दिसत आहे. काँग्रेसला बळ देत आपलीही ताकद वाढवण्याची संधी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये लक्ष घातले तर त्याचा फायदा विधानसभेला निश्चितच होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होऊन एक महिना होत आला आहे. या काळात नांदेड काँग्रेसमुक्त करण्यासाठी चव्हाणांनी आटोकाट प्रयत्न केले. नांदेडची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न केले गेले, पण ते अपुरे पडले.
चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याची संधी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आहे.
पण या दोन्ही नेत्यांकडून फारसे प्रयत्न केले गेले नाहीत. या पक्षाचा एकही मोठा नेता नांदेडला फिरकला नाही, की जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर या दोन्ही पक्षात चर्चा होताना दिसतेय. नांदेड जिल्हा काँग्रेसचा गड असल्याने इतर पक्षांचा फारसा विस्तार इथे झाला नाही. असे असताना शिवसेनेने जिल्ह्यात चांगले बस्तान बसवले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीत राहून पक्षाचा जमेल तसा विस्तार केला. पण आता काँग्रेस कमकुवत झाली आहे.
अशा परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) गट या पक्षाला खूप मोठा स्पेस विस्तारासाठी आहे. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर आहेत. त्यांना आधार व पाठबळाची गरज आहे. जिल्ह्यातील मुस्लिम व दलित मतदारांनी आता चव्हाणांना साथ द्यायची नसल्याचे दिसत आहे आणि तेही नव्या पर्यायाच्या शोधात आहेत.
मतदार एका आश्वासक दृष्टीने ठाकरे -पवार यांच्याकडे पाहत आहेत. नांदेडची परिस्थिती सुधारण्यासाठी ठाकरे- पवार यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे सध्या राज्यभरात जनसंवाद दौरे करत आहेत, तर शरद पवार अजून लोकसभेच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले नाहीत. या दोन्ही नेत्यांनी एकदा नांदेड जिल्ह्याचा दौरा करावाच, अशी इच्छा या पक्षाच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.