Nanded Political News : जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्ष अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे. चार दशके काँग्रेसमध्ये राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करत राज्यसभेवर खासदारकी मिळवली. चिखलीकर आणि चव्हाण आता एकाच पक्षात असल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपेल, अशी शक्यता फोल ठरताना दिसत आहे. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरही अशोक चव्हाण यांचा चिखलीकर विरोध कायम असल्याचे समोर आले आहे. नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांचे नाव पुढे केले आहे.
संभाजीनगर येथील सभेपूर्वी मीनल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत उमेदवारीवर दावा सांगितल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे विद्यमान खासदार चिखलीकर यांनीही काल अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. त्यामुळे प्रताप चिखलीकर यांची उमेदवारी कापली जाणार का? अशी चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू झाली आहे.नांदेड, राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा येत्या तीन ते चार दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या संभाजीनगर येथील कार्यक्रमात डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी भेट घेत चिखलीकर यांनाच आव्हान दिले आहे. Ashok Chavan bitter opposition about Pratap Patil Chikhalikar continues in BJP too.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांना जिल्हा आणि मराठवाड्यातील वर्चस्व टिकवून ठेवायचे आहे. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात तर त्यांना अजिबात वाटेकरी नको आहे. त्यामुळे ज्या खासदार चिखलीकरांना त्यांनी कायम विरोध केला तीच भूमिका भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांनी कायम ठेवली आहे. स्वतः राज्यसभेवर गेल्यानंतर नांदेड लोकसभेच्या जागेवरही आपलाच दबदबा कायम राहावा, यासाठी अशोक चव्हाण यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. नव्यानेच भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे चव्हाण यांचे दिल्लीतील वरिष्ठांशी चांगले ट्युनिंग जमले आहे. शिवाय मराठवाड्यात जास्त जागा निवडून आणायच्या असतील तर अशोक चव्हाण यांची मर्जी राखावी लागणार आहे. त्यामुळे सध्या नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचा शब्द भाजप श्रेष्ठी खाली पडू देत नाहीत.Nanded Loksabha
याचाच फायदा उचलत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आपल्या सगळ्या सोयऱ्यांना आणून जिल्ह्यावर आपली मजबूत पकड कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात अडथळा ठरणाऱ्या विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर ( Pratap Patil Chikhalikar ) यांची थेट उमेदवारी कापण्याचा डाव चव्हाण यांनी टाकला आहे. यासाठी सक्षम पर्याय म्हणून त्यांनी मीनल खतगावकर यांचे नाव पुढे करून त्यांना निवडून आणण्याचा शब्द कालच्या संभाजीनगर भेटीत अमित शाह यांना दिल्याची चर्चा आहे. नांदेड जिल्हा शतप्रतिशत भाजपा करण्यासाठी अशोक चव्हाण यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांचे दोन दिवसांपूर्वी नांदेडच्या विमानतळावर आगमन झाले होते. त्यांचे अशोक चव्हाण यांनी स्वागत करुन राज्यसभेत पाठवून खासदार केल्याबद्दल आभार मानले. एकूणच चव्हाण यांनी भाजपाच्या दिल्लीतील थेट मोदी आणि शाह या नेत्यांशीच संपर्क आणि संबंध वाढवणे सुरू केले आहे.Loksabha election 2024
छत्रपती संभाजीनगरात गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत अशोक चव्हाण यांना बोलण्याची संधी देण्यात आली. तसेच व्यासपीठावर अमित शाह व अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे चव्हाणांचा आता भाजपमध्ये चांगलाच जम बसू लागला आहे. नांदेडच्या जागेवर भाजपा कोणाला उमेदवारी देतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी चिखलीकरांनी निवडणूकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. तर दुसरीकडे डॉ. मिनल पाटील खतगावकर Minal Patil Khatgaokar ह्या काँग्रेसमध्ये असताना त्यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली होती. त्यांना काँग्रेस उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली होती. पण हे दोन्ही संभाव्य उमेदवार सध्या भाजपमध्ये असून दोघांनी ही उमेदवारी मागितली आहे हे विशेष.
भारतीय जनता पक्षाला ( BJP ) मिशन 45 यशस्वी करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांचे मत उमेदवारी देताना महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच्या शिफारशीनुसार पक्षाने उमेदवारी देण्याचे ठरविले तर डॉ. मिनल पाटील खतगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. तर दिल्ली दुसऱ्यांदा गाठण्यासाठी चिखलीकरांनी तयारी सुरू केली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी उमेदवारी मलाच मिळणार व जिंकून येणार, असा दावा केला होता. पण अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) भाजपात आल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. या बदलत्या परिस्थितीत चिखलीकरांच्या उमेदवारीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
Edited BY : Rashmi Mane