NCP Merger : विलीनकरणाच्या चर्चेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र! बीडमध्ये दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Beed Water Crisis : गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात ज्या पद्धतीने घडामोडींना वेग आला आहे, त्यावरून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
NCP Merger
NCP MergerSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. तसेच १० तारखेला पुन्हा भेटण्याबाबतही चर्चा झाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला आणखी वेग आला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत सूचक विधान केले होते. 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतीलच,' असे त्या म्हणाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही गटांच्या लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकत्रित पुढाकार घेतला. मनकर्णिका धरणावर 'गाळपेरा' उपक्रमांतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या प्रश्नावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत यावेळी नेत्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.

मनकर्णिका धरणावरील या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित होते. मात्र, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान, उपस्थित नेत्यांनी या कार्यक्रमामागे कोणतेही राजकीय समीकरण नसून तो केवळ दुष्काळ निवारणासाठी आयोजित केल्याचे स्पष्ट केले.

NCP Merger
NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा, सुनेत्रा पवार भूमिका मांडणार?

यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी गाळपेरा उपक्रमाचे कौतुक केले. मात्र, शासनाने त्यांच्या मागणीनुसार अद्याप ठोस उपाययोजना केलेल्या नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेबाबत बोलताना, 'हा मतदारसंघ दादा गटाच्या आमदाराचा आहे आणि मी पवार साहेबांचा खासदार आहे. यात राजकारण नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार विजयसिंह पंडित यांनीही बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. सध्या जिल्ह्यात भीषण दुष्काळ असून आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पशुधन वाचवण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. या उपक्रमामागे कोणतेही राजकारण नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही जिल्ह्यातील पाणी आणि चारा टंचाईकडे लक्ष वेधले. गावोगावी पाणी आणि चारा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पशुधन टिकले तरच शेतकरी टिकेल, या उद्देशाने गाळपेरा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता, हा भाग गेवराई विधानसभा मतदारसंघात येतो आणि क्षीरसागर सध्या ग्रामीण भागात फिरून दुष्काळग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेत असल्याचे राजेंद्र मस्के यांनी स्पष्ट केले.

NCP Merger
Ncp Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, 'दोघेच सांगू शकतात'

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत राजकीय पातळीवर चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे बीडमध्ये दुष्काळाच्या मुद्द्यावर दोन्ही गटांचे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे मनकर्णिका धरणावरील गाळपेरा उपक्रम हा केवळ दुष्काळ निवारणाचा प्रयत्न असला, तरी या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादींच्या जवळिकीबाबत राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.