

Georai News : ऐन मतदानाच्या दिवशी गेवराईमध्ये भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, दगडफेक आणि गाडी फोडण्याचा प्रकार घडला. त्यानंतर मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गेवराईत येऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दोन राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या ज्या समर्थकांनी गेवराईत राडा घातला त्यांना सोडणार नाही.
या प्रकरणात अद्याप फिर्याद आलेली नाही, परंतु फिर्याद आली नाही तरी पोलीस स्वतःहून यात पुढाकार घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे काँवत यांनी माध्यमांना सांगितले. गेवराईतील जनतेने न घाबरता मतदानाचा अधिकार बजवावा. सकाळी घडलेल्या प्रकारानंतर मोठा पोलीस (Police) बंदोबस्त गेवराई शहरात तैनात करण्यात आलेला आहे. मी स्वतः सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. सकाळी जो राडा झाला त्यात कोण होते? यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.
ज्यांनी कोणी शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा काँवत यांनी दिला आहे. सकाळचा प्रकार वगळता गेवराईतील वातावरण आता शांत आहे, कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे. कुठेही चुकीचे काही आढळले तर त्याची माहिती पोलीसांना किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहनही काँवत यांनी केले आहे.
दरम्यान, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी या प्रकारावर हा विरोधकांनी जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचा आरोप केला आहे. विकासाच्या मुद्यावर त्यांना निवडणुक लढवायची नसल्याने असा काही प्रकार केला जाणार, याची कुणकुण आपल्या दोन दिवसापूर्वीच लागली होती, असेही पंडीत यांनी म्हटले. गेवराईत सध्या शांतता आहे, दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले आहे. लोकांनी दहशतीला किंवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पंडित यांनी केले.
गेवराई नगरपालिकेच्या निवडणुक प्रचारात एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार (Laxman Pawar) आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये आज ऐन मतदानाच्या दिवशीच मोठा राडा झाला. एकमेकांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याचा प्रयत्न झाल्याने गेवराईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोरील गाडीवर पंडित समर्थकांनी दगड घालत ती फोडली. त्यानंतर स्वतः पवार हे पंडित समर्थकांच्या अंगावर धावून जातांना दिसले. त्यानंतर अचानक दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दगडफेक आणि पळापळ सुरू झाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या घटनेत एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. परंतू, पंडित आणि पवारांच्या बंगल्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.