

प्रसाद जोशी
Parbhani Politics News : 'सबका साथ सबका विकास' हा खरेतर भाजपने दिलेला नारा. परभणी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल याच सूत्राला अनुसरून होत आहे. सत्तेच्या राजकारणात विविध राजकीय पक्षांनी एकत्र येणे व विशेषतः परस्परविरोधी विचारसरणी असलेले राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्रित होणे यात फारसे नवल नाही, मात्र राज्यातील सर्वच प्रमुख पक्षासोबत एकत्रित असणे हे बहुधा पहिलेच उदाहरण असावे. हा विक्रम परभणीच्या नावावर कोरला गेला आहे. याचे कारण असे की, राष्ट्रवादी काँग्रेस हा असा एकमेव पक्ष ठरला आहे, जो सत्ताप्राप्तीसाठी प्रत्येक पक्षासोबत थेट गेला आहे अथवा अप्रत्यक्ष मदत घेतली आहे.
परभणी जिल्हा परिषदेची निवडणुक झाली आणि यामध्ये जवळपास प्रत्येक पक्ष स्वबळावर लढला. संख्याबळानुसार भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे), काँग्रेस असे संख्याबळ आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) गटामध्ये बहुमत होईल एवढे संख्याबळ असल्यामुळे अध्यक्ष भाजप व उपाध्यक्ष शिवसेना (शिंदे) गटाचा होईल, असा कयास होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईतून सूत्र हलवले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सामावून घेण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार अध्यक्षपद भाजपकडे तर राष्ट्रवादी काँग्रेसने उपाध्यक्षपद पदरात पडून घेतले. तोंडातील घास काढून घेतल्यामुळे शिंदेच्या शिवसेना पक्षाने या संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. यामुळे पाथरी विधानसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीला पुन्हा खतपाणी मिळाले. आमच्या सोबत धोका झाला, अशी जाहीर प्रतिक्रीया शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी माध्यमांना दिली.
पाथरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी शिवसेनेसोबत
पाथरी नगर परिषद निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये निकालानंतर दिलजमाई झाली. शिवसेनेच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोईज अन्सारी यांची नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
परभणी महापालिका,पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत
परभणी महानगरपालिकेत महापौर निवड करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला साथ दिली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांना बजावलेला 'व्हिप'ही डावलण्यात आला. अशीच परिस्थिती परभणी पंचायत समिती मध्येही दिसून आली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी चव्हाण तर उपसभापतीपदी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे विवेक रसाळ यांची निवड झाली.
पाथरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ
पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत व पाथरी नगरपरिषद निवडणूकीमध्ये कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये पाथरी पंचायत समितीमध्ये मनोमिलन झाले. सभापती आणि उपसभापती निवडताना काँग्रेस पक्षाने खंबीर साथ दिली. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत राहण्यासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अशा सर्वच प्रमुख पक्षासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेण्याऐवजी सत्तेत राहता यावे, म्हणून सर्वच राजकीय पक्षांची साथ घेणारा परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचा 'सबका' (सर्वच राजकीय पक्षांचा) साथ आणि सबका (सर्वच राजकीय नेत्यांचा) विकास पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.