

Nida Khan Case News : नाशिक येथील टीसीएस कंपनीतील निदा खान हिच्यावर कथित धर्मांतर व कार्पोरेट जिहाद प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील एका घरातून पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. ज्या घरातून तिला अटक करण्यात आली ते घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे असल्याचे समोर आले होते.
निदा खान हिला एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच मतीन पटेल यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता. या प्रकरणाचे इम्तियाज जलील हेच मास्टर माइंड आहेत, असा आरोप शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच घडलेल्या निदा खान अटक प्रकरणामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा व शंका निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणांमध्ये काही राजकीय व्यक्ती तसेच संबंधित घटकांचा सहभाग असल्याच्या आरोपांची चर्चा समाज माध्यमे व जनतेमध्ये होत आहे. विशेषता एमआयएम पक्षाशी संबंधित काही व्यक्ती व नगरसेवक मतीन पटेल तसेच माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaj Jaleel) यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष व आदर्श चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे जनतेचा विश्वास आबाधित ठेवण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. निष्पक्ष चौकशी झाल्यास संबंधित दोषी व्यक्तींवर योग्य कारवाई होईल तसेच जनतेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम दूर होण्यास मदत होईल. आपण या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती संजय शिरसाट यांनी या पत्राद्वारे केली आहे.
निदा खान अटक प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील त्याच घरावर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत महानगरपालिकेने बुलडोझर फिरवला. या कारवाईवरून संतप्त झालेल्या इम्तियाज जलील यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या अतिक्रमणावर बुलडोझर कधी फिरवणार? असा थेट सवाल केला होता.
दरम्यान, या प्रकरणावरून संजय शिरसाट व इम्तियाज जलील यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. संजय शिरसाट यांनी निदा खान अटक प्रकरणात केलेली एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्री मान्य करतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.