Dhananjay Munde Rakshabandhan: 'पाणी डोळ्यात तुझ्या जिव माझा जाई' ; मुंडे भगिनींनी राखी बांधल्यानंतर धनंजय मुंडेंच्या भावना
Beed Politics News : राजकीय दुरावल्यानंतर पुढे मुंडे भावंडांमध्ये बहीण-भावांचे भाऊबीज, राखी पोर्णिमा सण देखील बंद झाले. मात्र, योगायोगाने अगोदर एकमेकांचे विरोधक असलेले दोघांचे पक्ष (राष्ट्रवादी व भाजप) आता मित्रपक्ष झाले. त्यामुळे आता ही भावंडेही नात्याने पुन्हा जवळ आले आहेत. बुधवारी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंडे भगिनींकडून मुंबईतील पंकजा मुंडेंच्या घरी राखी बांधून घेतली.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार डॉ. प्रितम मुंडे व यशश्री मुंडे या तिघींनी मुंडेंचे औक्षण करुन राख्या बांधल्या. यानंतर प्रज्ञा मुंडे यांच्यासह या चौघांनी एकत्र फोटोही काढला. विशेष, म्हणजे बहीण भावांच्या नात्यातील सर्वात मोठा सण असलेली राखी पोर्णिमेला मुंडे भावंडे एकत्र येण्याचा योग १३ वर्षानंतर आला आहे.
धनंजय मुंडे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले,
'पाणी डोळ्यात तुझ्या जीव माझा जाई' लागताताठीच तुला वेदना मला होई अेठी माझ्या येई रोज तुझी अंगाई तुझ्या रुपी दिसे जणू मला माई ऊन सावली तु रखुमाऊली साता जन्माची पुण्याई, बहिणाबाई’
या गीतांसह या बहिणींकडून राखी बांधतानाचे फोटो टाकून त्यांनी 'ताई, मोठा भाऊ ह्या नात्याने सदैव सोबत आहे व राहील' असा शब्दही दिला आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतानाच राज्याचे नेतृत्व करत होते. त्यावेळी जिल्हा परिषद व जिल्ह्याच्या राजकारणाची मुंडेंची कमान दिवंगत पंडितअण्णा मुंडे व त्यांचे पुत्र धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सांभाळत असत. साधारण २००६ -०७ च्या दरम्यान, पंकजा मुंडे जलसंधारण, महिला व सामाजिक कामांच्या निमित्ताने सक्रीय झाल्या. २००९ मध्ये प्रथम गोपीनाथराव मुंडे यांनी लोकसभा निवडणुक लढवावी लागली. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी कोणाला हा पेच निर्माण झाला. राजकारणात सक्रीय असल्याने सहाजिकच धनंजय मुंडे यांना उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते.
मात्र, पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी विजयही मिळविली. मात्र, तेव्हापासून मुंडे कुटुंबात अंतर्गत दरी वाढीची सुरुवात झाली. पुढे धनंजय मुंडे यांना भाजपने (BJP) विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर २०१२ मध्ये नगर पालिका निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांनी काकांना आव्हान देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या राजकीय दुराव्यानंतर मुंडे भावंडांमधील नात्यांतही दुरावा निर्माण झाला. त्यानंतर २०१० पासून या भावंडांमध्ये राखी, भाऊबीज असे सणही बंद झाले होते.
राजकारणात देखील दोघांचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व भाजप हे एकमेकांचे विरोधी पक्ष होते. एकमेकांच्या कारभारावर देखील दोघे सडकून टीका करत. अगदी चिक्की घोटाळ्यापासून ते जिल्ह्यात गुंडाराज अशा दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असत. फार तर दोघांमधील कोण्या नातेवाईकांच्या विवाह समारंभावेळी किंवा अन्य प्रसंगीच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकत्र दिसत.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी राज्यात नवे राजकीय समिकरण घडल्यानंतर धनंजय मुंडे यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला. यानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना अचानक भेटायला गेले होते. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले होते. पुन्हा बुधवारी धनंजय मुंडे त्यांच्या वरळीतील घरी गेले. त्यांच्या काकी व पंकजा मुंडे यांच्या आई प्रज्ञा मुंडे देखील उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे, डॉ. प्रितम मुंडे, यशश्री मुंडे या तिघी बहिणींनी आपले थोरले बंधू धनंजय मुंडे यांचे औक्षण करुन त्यांना राख्या बांधल्या.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.