अय्युब कादरी
Dharashiv News : पंकजा मुंडे यांनी धाराशिव मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) केली आहे. तसेच, उमरगा तालुक्यातील मुरूमचे रहिवासी तथा भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे यांनीही दंड थोपटले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मर्जीशिवाय भाजपचा धाराशिवमधील लोकसभेचा उमेदवार निश्चित होणे अशक्य आहे. (Pankaja Munde to contest Lok Sabha elections from Dharashiv?)
लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीपूर्वीही अशाच राजकीय हालचाली झाल्या होत्या. राणाजगजितसिंह पाटील त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधे होते. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले होते. मात्र, मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील. डॉ. पद्मसिंह पाटील हेच उमेदवार असतील, यावर शरद पवार ठाम राहिले होते. लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्याने धाराशिव काँग्रेसकडे घेऊन येथून निवडणूक लढवण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख इच्छुक होते. त्यांनी त्यासाठी थेट सोनिया गांधी यांच्यामार्फत सूत्रे हलवली होती, अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता.
पंकजा मुंडे यांनी धाराशिवमधून लोकसभा लढवावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांनी शनिवारी (ता. ९ सप्टेंबर) केली आहे. शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने पंकजा या शनिवारी परंड्यात आल्या होत्या. त्यावेळी बनसोडे यांनी स्वागत करत ही मागणी केली हेाती.
पंकजा या राष्ट्रीय राजकारणात जातील का, असाही प्रश्न आहे. मागील विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता धनंजय मुंडे हे अजित पवार गटात असून, भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन मंत्रिपद भूषवत आहेत. जागावाटपात विद्यमान आमदारांना त्यांची जागा सुटणार, असे सूत्र राहिले तरी परळी भाजपला सुटणार की अजित पवार गटाला, हे या घडीला कुणालाही सांगता येणार नाही.
रिपब्लिकन पक्षाची मागणी धाराशिवच्या पाटील घराण्याला चिमटा तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. पाटील घराण्याला चिमटा काढणे भाजपला परवडणारे नाही. कारण जिल्ह्यात पाटील यांना वगळले तर भाजपची फारशी ताकद नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची मागणी भाजपकडून गांभीर्याने घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. पंकजा मुंडेही राष्ट्रीय राजकारणात जातील, याचीही शक्यता तूर्त तरी वाटत नाही. आमदार राणाजगजितसिंह पाटील सांगतील तोच धाराशिवचा उमेदवार राहील, असे सध्याचे चित्र आहे. राणाजगजितसिंह पाटील हे २००९ मध्ये राष्ट्रवादीत होते आणि शरद पवारांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. भाजपमध्येही त्यांचे तेच स्थान कायम आहे किंवा नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
भाजपचे बसवराज मंगरुळे हे मूळचे मुरूमचे असले तरी ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायिक आहेत. धाराशिव जिल्ह्यात त्यांची स्वत:ची अशी कार्यकर्त्यांची फळी नाही. त्यामुळे ते पूर्णपणे पक्ष संघटनेवर अवलंबून आहेत. उमेदवारी जाहीर होईपर्यंत अशा घडामोडी होतच राहण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.