Parbhani Political News : लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट सामना होण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील तीन लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
काल महायुतीचे महादेव जानकर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर आज महाविकास आघाडीचे संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी आपला अर्ज दाखल केला. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) आणि माजी मंत्री राजेश टोपे वगळता एकही मोठा नेता उपस्थित नव्हता.
महादेव जानकरांचा(Mahadev Jankar) अर्ज दाखल करण्यासाठी काल परभणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे हे नेते उपस्थित होते. या वेळी या नेत्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा सुरू असतानाच आज महाविकास आघाडीचे संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी रखरखत्या उन्हात निघालेल्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाली होती. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थित जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर झालेल्या सभेत महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी संजय जाधव(Sanjay Jadhav) यांना तिसऱ्यांदा निवडून देत हॅटट्रिक साधण्याचे आवाहन केले. महायुतीच्या कालच्या मेळाव्यात अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा आधार घेत आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी जानकर यांच्यावर टीका केली. काल 1 एप्रिल तारीख होती, त्यामुळे राज्यातील दोन हाफ यांनी इथे येऊन जानकरांना फूल बनवल्याचा टोला या वेळी लगावण्यात आला.
मोदी की गॅरंटी या भाजपच्या घोषणेची खिल्ली उडवताना काँग्रेस आमदार सुरेश वरपडूकर यांनी ज्यांना पत्नीला सात जन्म साथ देण्याची गॅरंटी पाळता आली नाही, ते देशाच्या विकासाची गॅरंटी काय पाळणार? अशी जळजळीत टीका केली. शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीने विरोधकांना जाळून टाका, असे आवाहन करतानाच विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी महाविकास आघाडीतील सगळे पक्ष झपाटून कामाला लागले असल्याचा दावा वरपूडकर यांनी केला. एसटीमधून धनगर समाजाला आरक्षण देतो असे सांगून फडणवीसांनी जानकरांनाही फसवले, असा आरोप विजय गव्हाणे यांनी केला.
अजित पवारांनी आपली जागा वाचवण्यासाठी जानकरांना बळीचा बकरा केल्याची टीकाही या वेळी करण्यात आली. संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सुरशे वरपूडकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे, डॉ. राहुल पाटील, राजेश राठोड, विजय गव्हाणे, विजय भांबळे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, सीताराम घनदाट, सुरेश जेथलिया, लक्ष्मण वडले, सुरेश देशमुख, संतोष सांबरे, ए.जे. पाटील बोराडे आदी नेत्याची उपस्थिती होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.